अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:45 IST2025-08-20T13:45:02+5:302025-08-20T13:45:18+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथील शिखर बैठक कोणत्याही ठोस निष्कर्षांविना संपली असली तरी, एका माजी अग्निशमन दलाच्या निरीक्षकासाठी ही बैठक नशीब बदलणारी ठरली आहे.

अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथील शिखर बैठक कोणत्याही ठोस निष्कर्षांविना संपली असली तरी, एका माजी अग्निशमन दलाच्या निरीक्षकासाठी ही बैठक नशीब बदलणारी ठरली आहे. अँकोरेजचे रहिवासी असलेले मार्क वॉरेन यांना रशियन सरकारने तब्बल १९ लाख रुपयांची नवीकोरी मोटारसायकल भेट दिली आहे.
नेमकं काय घडलं?
मार्क वॉरेन, जे अँकोरेजमध्ये फायर इंस्पेक्टर म्हणून निवृत्त झाले आहेत, त्यांच्याकडे 'Ural' कंपनीची एक जुनी मोटारसायकल आहे. ही बाईक मूळची रशियन बनावटीची आहे. अलीकडेच एका रशियन टीव्ही चॅनेलने वॉरेन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांच्या जुन्या बाईकसाठी सुटे भाग मिळवणे किती कठीण आहे. ही मुलाखत रशियामध्ये प्रचंड व्हायरल झाली आणि या घटनेने अनपेक्षित वळण घेतलं.
सरकारकडून अनोखी भेट
१३ ऑगस्ट रोजी, म्हणजेच अमेरिका-रशिया शिखर बैठकीच्या दोन दिवस आधी, वॉरेन यांना एका रशियन पत्रकाराचा फोन आला. रशियन सरकारने त्यांना नवी मोटारसायकल भेट देण्याचा निर्णय घेतल्याचं त्याला सांगण्यात आलं. सुरुवातीला वॉरेन यांना हा एक प्रकारचा विनोद वाटला, पण शिखर बैठकीनंतर त्यांना खरी माहिती मिळाली. ही भेट खरोखरच अँकोरेजला पोहोचली होती.
हॉटेल पार्किंगमध्ये मिळालं सरप्राईज
वॉरेन त्यांच्या पत्नीसह हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा पार्किंगमध्ये सहा रशियन नागरिक उभे होते. त्यांच्यासोबत एक चकचकीत, ऑलिव्ह-ग्रीन रंगाची 'Ural Gear Up' मोटारसायकल उभी होती. तिची किंमत सुमारे २२,००० डॉलर म्हणजेच जवळपास १९ लाख रुपये आहे. भेट देणाऱ्यांनी फक्त एकच विनंती केली, की त्यांनी फोटो काढण्याची आणि एक छोटी मुलाखत देण्याची परवानगी द्यावी. वॉरेन यांनी कॅमेऱ्यासमोर गाडी चालवून दाखवली, तेव्हा कॅमेरामॅन धावत त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करत होते.
२४ तासांत भेट पोहोचली!
या अनोख्या भेटीने वॉरेन खूप आनंदी आहेत, पण त्यांच्या मनात एक भीतीही आहे. "मला भीती वाटते की लोक मला रशियासोबत जोडून पाहतील. माझ्या कुटुंबाला कोणत्याही अडचणीत अडकवायचं नाहीये," असं ते म्हणाले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ही बाईक १२ ऑगस्ट रोजी तयार झाली आणि फक्त २४ तासांच्या आत थेट अलास्कामध्ये पोहोचवण्यात आली. या संपूर्ण घटनेमुळे मार्क वॉरेन एका रात्रीत चर्चेचा विषय बनले आहेत.