'ड्रॅगन-एलिफंट सोबत आले तर...!' अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वादावरून भारतासंदर्भात काय म्हणाला चीन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:39 IST2025-03-07T17:39:13+5:302025-03-07T17:39:34+5:30
"आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेले दोन्ही देश एकत्र आले, तर..."

'ड्रॅगन-एलिफंट सोबत आले तर...!' अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वादावरून भारतासंदर्भात काय म्हणाला चीन?
टॅरिफच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेतील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. अमेरिकेने चीनमधून होणाऱ्या आयातीवर २० टक्के कर जाहीर केला आहे. यातच आता, चीनचे लक्ष भारताकडे लागले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली आणि बीजिंगला अर्थात भारत आणि चीनला सोबत काम करण्याचे आणि वर्चस्ववाद तथा सत्तेच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाकडे अमेरिकेसोबत सुरू असलेल्या वादाला जोडून बघितले जात आहे.
यासंदर्भात बोलताना, ड्रॅगन आणि एलिफंटला (हत्ती) नाचवणे एक आवश्यकता आहे आणि हाच एकमेव योग्य पर्याय आहे. एकमेकांना कमकुवत करण्यापेक्षा, एकमेकांना पाठिंबा देणे आणि सहकार्य मजबूत करणे, हे दोन्ही देशांच्या आणि जनतेच्या मूलभूत हिताचे आहे, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या बैठकीनंतर म्हटले आहे.
'दोन मोठ्या अर्थव्यवस्था सोबत आल्या तर...'
वांग पुढे म्हणाले, आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेले दोन्ही देश एकत्र आले, तर आंतरराष्ट्रीय संबंधांचे लोकशाहीकरण तथा 'ग्लोबल साऊथ'चा विकास आणि बळकटीकर होईल. 'ग्लोबल साउथ' अर्थात असे देश ज्यांना विकसनशील, कमी विकसित अथवा अविकसित म्हटले जाते आणि हे देश प्रामुख्याने आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत वसलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेक वेळा 'ग्लोबल साउथ' हा शब्द वापरताना दिसतात.
भारत-चीन संबंधांत सकारात्मक प्रगती -
वांग म्हणाले, गेल्या वर्षी रशियाच्या कझान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील यशस्वी बैठकीनंतर चीन-भारत संबंधांमध्ये सकारात्मक प्रगती झाली आहे. सर्व स्तरांवर देवाणघेवाण आणि व्यावहारिक सहकार्य मजबूत करण्यात आले आणि अनेक सकारात्मक परिणामही साध्य करण्यात आले.
मात्र, भारताने चीनच्या या विधानावर अद्याप कसल्याही स्वरुपाची प्रतिक्रिया दिलेली नाही. तत्पूर्वी, भारत सरकार चीनसोबतच्या संबंधांसाठी सकारात्मक दिशा निश्चित करण्यासाठी काम करत आहे, असे गुरुवारी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले होते.