अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:08 IST2025-12-20T19:06:36+5:302025-12-20T19:08:45+5:30
या ऑपरेशनची माहिती देताना अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले, "ही कोणत्याही युद्धाची सुरुवात नाही, तर आमच्या लोकांवरील हल्ल्याचा घेतलेला बदला आहे."

अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
वॉशिंग्टन: अमेरिकेने सीरियातील 'इस्लामिक स्टेट'च्या (IS) दहशतवाद्यांविरुद्ध 'ऑपरेशन हॉकआई स्ट्राइक' अंतर्गत मोठी लष्करी कारवाई केली आहे. मध्य सीरियातील दहशतवाद्यांचे शस्त्रसाठे आणि सुमारे ७० पायाभूत तळांना अमेरिकन सैन्याने निशाणा बनवले. खरे तर, दोन अमेरिकन सैनिक आणि एक अमेरिकन नागरिक इंटरप्रेटरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या ऑपरेशनची माहिती देताना अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले, "ही कोणत्याही युद्धाची सुरुवात नाही, तर आमच्या लोकांवरील हल्ल्याचा घेतलेला बदला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली, अमेरिका आपल्या नागरिकांच्या रक्षणाच्या बाबतीत कधीही मागे हटणार नाही." या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याचेही त्यांनी नमूद केले.
यामुळे करण्यात आली ही कारवाई... -
गेल्या शनिवारी (१३ डिसेंबर २०२५) मध्य सीरियातील पालमायरा शहरात इसिसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकन आणि सीरियाई सुरक्षा दलांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन अमेरिकन जवानांचा आणि एका नागरिक इंटरप्रेटरचा मृत्यू झाला होता. तसेच या हल्ल्यात तीन इतर अमेरिकन सैनिक जखमी झाले होते. या 'क्रूर हत्येचा' बदला घेण्यासाठीच 'ऑपरेशन हॉकआई स्ट्राइक' सुरू करण्यात आले आहे. संबंधित हल्लेखोरांना प्रत्युत्तरात कारवाई करत त्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
ट्रम्प यांचा इशारा या कारवाईवर भाष्य करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आमच्या शूर देशभक्तांच्या हत्येच्या बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला." सीरियात इसिसच्या वाढत्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अमेरिकेने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.