अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रहार, केवळ तीनच आठवड्यांत 1.6 कोटी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 21:52 IST2020-04-10T21:38:00+5:302020-04-10T21:52:03+5:30
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या देशात केवळ संक्रमितांचीच ...

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रहार, केवळ तीनच आठवड्यांत 1.6 कोटी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या देशात केवळ संक्रमितांचीच संख्या वाढत आहे, असे नाही. तर येथील अर्थव्यवस्थेवरही कोरोनाने घणाघातील प्रहार करायला सुरुवात केली आहे. येथील अर्थव्यवस्था आता पटरीवरून खाली घसरू लागली आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे, कोरोना महामारीने गेल्या तीन आठवड्यात येथील तब्बल दीड कोटीहून अधिक लोकांना बेरोजगारीच्या गर्तेत ढकलले आहे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, आगामी काही महिन्यात देशाची अर्थव्यवस्था पटरीवर येईल, असा विश्वास दर्शवला आहे. येथे आतापर्यंत जवळपास 4 लाख 70 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास 17 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
66 लाख लोकांचा बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज -
कोरोनामुळे 33 कोटी एवढी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवळपास 97 टक्के लोकसंख्या घरात कैद झाली आहे. उद्योग धंदे ठप्प आहेत. हवाई वाहतुकीत 96 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या केवळ तीन आठवड्यांतच 1.6 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. याकाळात तब्बल 66 लाख अमेरिकन नागरिकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला आहे. या आकड्यांवरून स्पष्ट होते, की दोन लाख कोटी डॉलरचे (जवळपास 150 लाख कोटी रुपये) सहायता निधीही कुचकामी ठरला आहे.
ट्रम्प म्हणाले, अर्थव्यवस्था अधिक चांगली होईल -
या आकड्यांवर शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले, 'मला वाटते, की अर्थव्यवस्था अधिक चांगली होईल. आपल्याकडे चांगल्या योजना आहेत. एवढेच नाही तर आपण कृषीमंत्र्यांना कोरोनाचा फटका बसलेल्या अमेरिकेतील शेतकऱ्यांनाही तत्काळ मदत करण्यात यावी, असा आदेश दिला आहे.
रुग्णालयांतील रुग्णांच्या संख्येत घट -
आपण मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत होत आसलेली वाढ पाहत आहोत. मात्र, रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. यावरून असे वाटते, की सर्व काही योग्य प्रकारे सुरू आहे, असे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्शंस डिसीजचे संचालक आणि कोरोना व्हायरससंदर्भातील व्हाइट हाऊस टास्क फोर्सचे सदस्य अँटनी फासी यांनी म्हटले आहे.