“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 14:17 IST2025-08-10T14:15:07+5:302025-08-10T14:17:54+5:30
American Economist Jeffrey Sachs: अमेरिकेच्या सापळ्यात भारताने अडकू नये. जागतिक व्यवस्थेत भारताने आपली स्वतंत्र आणि प्रभावी भूमिका बजावली पाहिजे, असेही या अर्थशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
American Economist Jeffrey Sachs: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये कमालीची कटुता आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ आकारला आहे. यासंदर्भात भारताकडे २१ दिवसांची मुदत आहे. यातच अमेरिकेतील एका अर्थशास्त्रज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली असून, भारताला एक महाशक्ती संबोधले आहे.
अमेरिकन नेत्यांकडून जास्त अपेक्षा करू नका. अमेरिकेतील राजकारण्यांना भारताबाबत किंचितही कणव नाही. क्वाडमध्ये अमेरिकेसोबत सामील होऊन भारताला चीनविरुद्ध दीर्घकालीन सुरक्षा फायदा मिळणार नाही. भारत ही एक महाशक्ती आहे, ज्याची स्वतःची स्वतंत्र जागतिक ओळख आहे. अमेरिकन राजकारणात भारताच्या हिताला प्राधान्य नाही. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेले ५० टक्के टॅरिफ हे केवळ चुकीचे, अन्यायकारक असून, असंवैधानिक आहेत. यातून हेच स्पष्ट संकेत जात आहेत की, वॉशिंग्टनशी संबंध कायमस्वरूपी विश्वासाच्या पायावर आधारित नाहीत, या शब्दांत प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावर तोंडसुख घेतले.
अमेरिकेच्या सापळ्यात भारताने अडकू नये
अमेरिका स्वतःला मित्र म्हणवून लोकांना फसवत आहे. भारताने या सापळ्यात अडकू नये. काही महिन्यांपूर्वीच्या भारत भेटीदरम्यान भारताला अमेरिकेसोबतच्या कोणत्याही व्यापक व्यापार संबंधांवर अवलंबून राहू नये, असा इशारा दिला होता याची आठवण त्यांनी करून दिली. भारत आणि चीनमधील सीमारेषेवरून तणाव असूनही, दोन्ही देशांमधील मजबूत आर्थिक संबंध भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. चीनची व्यापारी व्याप्ती आणि आर्थिक शक्ती अमेरिकेपेक्षा खूप मोठी आहे. जागतिक व्यवस्थेत भारताने आपली स्वतंत्र आणि प्रभावशाली भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षा जेफ्री यांनी व्यक्त केली. ते मीडियाशी बोलत होते.
दरम्यान, जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेने भारताविरुद्ध ५० टक्के टॅरिफ लावल्यामुळे आता दोन्ही देशांतील व्यापार वाटाघाटी गतिमान होतील का, या प्रश्नावर ट्रम्प यांनी म्हटले की, अजिबात नाही. जोपर्यंत हा मुद्दा (टॅरिफ) सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही वाटाघाटी होणार नाहीत. ट्रम्प यांनी आधी २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. ७ ऑगस्टपासून ते लागूही झाले आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी अजून २५ टक्के टॅरिफ लावले. त्यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ ५० टक्के झाले आहे.