"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 08:38 IST2025-08-28T08:34:32+5:302025-08-28T08:38:43+5:30

रशियाकडून तेल खरेदी केल्याने अमेरिकेने युक्रेन युद्धासाठी भारताला जबाबदार धरलं आहे.

American diplomat Peter Navarro linked India to Russia Ukraine war placed a condition to reduce tariff | "रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट

"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट

Peter Navarro on India:भारत रशियाला युक्रेनशी युद्ध सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदत करत करत असल्याचे सांगत ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के अतिरिक्त शुल्क लावला आहे. रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करुन अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला मदत करत असल्याचा आरोप केला होता. आता अमेरिकन राजदूत आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारत आणि रशिया यांच्यातील तेल कराराबद्दल धक्कादायक विधान केले. भारताने सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केल्याने रशियाच्या आक्रमकतेला प्रोत्साहन मिळाले आहे आणि अमेरिकन करदात्यांवर मोठा भार पडल्याचा आरोप पीटर नवारो यांनी केला.

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल सतत वेगवेगळी विधाने करत आहेत. याशिवाय ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर देखील लादला. आता भारतावर एकूण ५० टक्के कर आकारण्यात आला आहे, जो २७ ऑगस्टपासून लागू झाला आहे. दुसरीकडे व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर लादलेला कर कसा कमी करता येईल हे सांगितले आहे. तसेच त्यांनी रशिया युक्रेन युद्धाला मोदींचे युद्ध म्हटले. जर भारताने हे धोरण चालू ठेवले तर अमेरिकेला त्यावर कठोर भूमिका घेईल, असेही नवारो म्हणाले.

"भारताकडून रशियन तेलाची सतत खरेदी केल्याने मॉस्को आक्रमक झाला आहे आणि त्याचा अमेरिकन करदात्यांवर भार पडत आहे. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले तर उद्या त्याला अतिरिक्त करातून २५ टक्के सूट मिळू शकते. मोदी एक महान नेते आहेत, भारत ही एक परिपक्व लोकशाही आहे आणि ते परिपक्व लोक चालवत आहेत. भारतीय इतके गर्विष्ठ आहेत याचा मला त्रास होतो. ते म्हणतात की आमच्याकडे जास्त दर नाहीत. आम्ही कोणाकडूनही तेल खरेदी करू शकतो," असं पीटर नवारो म्हणाले.

"भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करून रशियन युद्धासाठी निधी पुरवत ​​आहे. रशिया त्या पैशाचा वापर आपल्या युद्ध यंत्रणेला निधी देण्यासाठी करतो आणि त्यामुळे अधिक युक्रेनियन लोक मारले जातात. यामुळे अमेरिकेतील प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो. त्याचे परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवरही जाणवत आहेत. भारतातील उच्च दरांमुळे आम्हाला नोकऱ्या, कारखाने सर्वच तोट्यात आहेत. करदात्यांनाही तोटा सहन करावा लागतो कारण आपल्याला मोदींच्या युद्धासाठी निधी द्यावा लागतोय," असंही नवारो यांनी म्हटलं.
 

Web Title: American diplomat Peter Navarro linked India to Russia Ukraine war placed a condition to reduce tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.