उणे २०-३० अंश सेल्सियस तापमानात अमेरिकन नागरिक शिट्ट्या वाजवत रस्त्यावर येतात, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 07:18 IST2026-02-12T07:17:50+5:302026-02-12T07:18:22+5:30

‘आईस’च्या भीतीने घरात कोंडल्या गेलेल्या स्थलांतरितांना मदत करण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी चळवळ सुरू केली आहे.

American citizens come out on the streets for protest against the ICE operation | उणे २०-३० अंश सेल्सियस तापमानात अमेरिकन नागरिक शिट्ट्या वाजवत रस्त्यावर येतात, तेव्हा...

उणे २०-३० अंश सेल्सियस तापमानात अमेरिकन नागरिक शिट्ट्या वाजवत रस्त्यावर येतात, तेव्हा...

प्राजक्ता पाडगांवकर, भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक, अटलांटा

अमेरिकेत सध्या सगळेच भीषण सुरू असल्यासारखे वाटत असले तरी इथे आनंददायी, आशादायीदेखील काही फुलून येते आहेच. ही गोष्ट आहे मिनेसोटा राज्यातल्या धीरोदात्त नागरिकांची. इथे दोन जुळी शहरं आहेत, सेंट पॉल आणि मिन्निआपोलीस. अनेक महिने इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आईस) या शहरात तळ ठोकून बसले आहे. विरोधक सत्तेवर असलेल्या राज्यात जाऊन अराजक, भय, आणि हिंसाचार पसरवणे हा अंतस्थ हेतू. बेकायदा रहिवाशांना शोधून शोधून टिपणे हे मुख्य काम. या देशविरोधी असंविधानात्मक कृत्याला, मिनेसोटाचे रहिवासी सडेतोड उत्तर देतात. या जन-चळवळीला एक नवा बाज आहे. इथली मंडळी अनोख्या पद्धतीने ‘आईस’च्या कारवाईला विरोध करताना दिसतात. इथले जागरूक नागरिक प्रत्येक असंवैधानिक कृतीची नोंद ठेवत आहेत. फोनमधील व्हिडीओ रेकॉर्डिंगमार्फत याबाबतची जनजागृती पसरवत आहेत. ‘सिग्नल’सारख्या सामाजिक माध्यमांद्वारे नागरिक संरक्षक गट निर्माण करून, अहोरात्र वस्त्यांमधून गस्त घालत आहेत. 

अनेकांनी कर्कश आवाज करणाऱ्या शिट्ट्या सोबत बाळगल्या आहेत. रस्त्याने जाताना जर ‘आईस’चे लोक दिसले तर शिट्टी/गाडीचा हॉर्न वाजवून ते सभोवतालच्या नागरिकांना सतर्क करतात. मुलांच्या शाळेच्या बस येण्या-जाण्याच्या मार्गांवर उभे राहून मुलांचे रक्षण करतात. एकत्र येऊन अनेक कलाकारांनी ‘आईस’विरोधी गाणी, भजने तयार केली आहेत. लोक रस्त्यांवर ही गाणी गात विरोध दर्शवतात. जिथे ‘आईस’ अधिकारी हॉटेलवर विश्रांतीसाठी जातात, तिथे जाऊन लोक जोरात ड्रम वाजवतात, फटाके फोडतात. मोर्चे, घोषणा, रोजच अव्याहत सुरू आहेत. यात अहिंसा न सोडता मंडळी स्वतःच्या शेजारी राहणाऱ्या लोकांसाठी रस्त्यावर उतरली  आहेत. एका वृद्ध संगोपन संस्थेतील वृद्ध, त्यांचे डॉक्टर, नर्स आणि वकील एकत्रितपणे ‘आईस’च्या कार्यालयात धरणे धरून बसली होती. 

या शहरांमधल्या शाळा सध्या बंद आहेत, अथवा ऑनलाइन सुरू आहेत. शिक्षक मुलांच्या मनातील अनिश्चितता, भय, यावर काय तोडगा काढता येईल, याचा विचार करत आहेत. ‘आईस’चे अधिकारी नागरिकांना  काही तास, अथवा दिवस, तुरुंगात डांबून हिवाळ्यात अनवाणी पायाने नेसत्या वस्त्रानिशी रस्त्यावर सोडून देत असल्याचे समजताच, काही वकील आणि सेवाभावी संस्थांनी तुरुंगाबाहेर थांबून लोकांना गरम कपडे, बूट देणे सुरू केले आहे. अनेक छोटे व्यवसाय यात होरपळून निघत आहेत, त्यांना आधार म्हणून शेजारपाजारच्या लोकांनी तिथे आवर्जून काही विकत घेणे सुरू केले आहे. अपुरी कागदपत्रे असलेले / नसलेले स्थलांतरित ‘आईस’च्या भीतीने घराबाहेर पडू शकत नाहीत. अशा कुटुंबांसाठी अमेरिकन नागरिक जेवण आणि वाण सामानाची व्यवस्था करत आहेत. इथले आदिवासी, त्यांची पारंपरिक नृत्ये करून विरोध दर्शवत आहेत. हा सगळा विरोध सुरू आहे ते एकमेकांच्या शेजाऱ्यांना सुरक्षित आणि एकीने राहता यावे याकरिता. अशा या अनोख्या नव्या असहकार चळवळीला नाव दिले गेले आहे ‘नेबरीझम’ अर्थात ‘शेजारधर्म’. उणे २०-३० अंश सेल्सियस तापमानात रस्त्यावर उतरून दंडेलशाहीचा विरोध करत असलेल्या या शहरांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस ‘नेशन’ या मासिकाने केली आहे.
    praj.padgaonkar@gmail.com

Web Title : अमेरिकी नागरिक जमावबंदी में ICE का विरोध, पड़ोसी एकता का प्रदर्शन।

Web Summary : मिनेसोटा निवासी 'नेबरिज्म' के माध्यम से ICE का विरोध करते हैं, आप्रवासियों की रक्षा करते हैं। वे सीटी, विरोध और सामुदायिक समर्थन का उपयोग करके सुरक्षा और एकता सुनिश्चित करते हैं। स्कूल बंद होने और भय के बावजूद, स्थानीय लोग आवश्यक वस्तुएं, कानूनी सहायता और अटूट एकजुटता प्रदान करते हैं।

Web Title : Americans protest ICE in freezing temperatures, showing neighborhood solidarity.

Web Summary : Minnesota residents resist ICE through 'Neighborism,' protecting immigrants. They use whistles, protests, and community support, ensuring safety and unity. Despite school closures and fear, locals provide essentials, legal aid, and unwavering solidarity.