Coronavirus: मला कोरोना झालाय; विमान उड्डाणावेळी 'तो' अचानक ओरडला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 15:59 IST2020-03-17T15:57:29+5:302020-03-17T15:59:15+5:30
Coronavirus विमानातील प्रवाशांची घाबरगुंडी; कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली

Coronavirus: मला कोरोना झालाय; विमान उड्डाणावेळी 'तो' अचानक ओरडला अन्...
डल्लास: सध्या जगभरात कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. आसपासच्या व्यक्तीला खोकला, शिंक आली तरी सगळीकडे त्याच्याकडे संशयानं पाहू लागतात. एका बाजूला कित्येक जणांनी कोरोनाची धास्ती घेतली असताना दुसरीकडे काही जण अद्यापही याकडे गांभीर्यानं पाहण्यास तयार नाहीत. उलट कोरोनाच्या नावाखाली टिंगल टवाळ्या सुरू आहेत. याचा फटका इतरांना मोठ्या प्रमाणात बसतोय. अमेरिकेच्या डल्लासवरुन नॅशविलेला जाणाऱ्या प्रवाशांना अशाच एका व्यक्तीमुळे मनस्ताप सहन करावा लागला.
अमेरिकन एअरलाईन्सचं विमान डल्लासवरुन नॅशविलेला जात होतं. त्यावेळी एका प्रवाशानं त्याला कोरोनाची बाधा झाल्याचा दावा केला. त्यामुळे इतर प्रवासी प्रचंड घाबरले. तर दुसरीकडे विमानातील आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यानंतर विमानतळावरील पोलिसांनी विमानात प्रवेश केला. त्यांनी कोरोना झाल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेतलं.
विमानातल्या कोरोना नाट्यामुळे विमानाच्या उड्डाणाला तब्बल आठ तास उशीर झाला. कोरोना झाल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशानं सुरुवातीला विमानातून उतरण्यास नकार दिला. त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांनी काम करण्यास असमर्थतता दर्शवली. तर इतर प्रवाशांचा गोंधळ उडाला. 'नेमकं काय झालं होतं, कोणालाही कळत नव्हतं. तो माणूस फक्त आजारी होता की त्याला खरंच कोरोना झाला होता, याची कल्पना नसल्याचं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती,' अशी माहिती विमानात उपस्थित असलेल्या एका प्रवाशानं दिली.
कोरोना झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी विमानातून खाली उतरवलं. यानंतर काही वेळानं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती विमानातल्या प्रवाशांना दिली. 'त्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली असून चिंतेचं काही कारण नाही. चेष्टा करण्यासाठी त्यानं कोरोना झाल्याचा दावा केला. खुद्द त्या व्यक्तीनंच चौकशीत आम्हाला ही माहिती दिली,' असं पोलिसांनी विमानातल्या प्रवाशांना सांगितलं. यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.