लख्वीच्या सुटकेने अमेरिका चिंतित
By Admin | Updated: April 12, 2015 01:27 IST2015-04-12T01:27:59+5:302015-04-12T01:27:59+5:30
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लष्कर ए तोईबाचा कमांडर जकी-उर-रहमान लख्वी याची कारागृहातून सुटका झाल्याबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

लख्वीच्या सुटकेने अमेरिका चिंतित
वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लष्कर ए तोईबाचा कमांडर जकी-उर-रहमान लख्वी याची कारागृहातून सुटका झाल्याबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानने २६/११च्या पीडितांना न्याय मिळवून देण्याप्रती वेळोवेळी बांधिलकी दर्शविली असूनही हे घडले, असे अमेरिकेने म्हटले आहे. फ्रान्सने लख्वीच्या सुटकेवर यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेफ रात्के यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही मुंबई हल्ल्याचा कथित सूत्रधार जकी-उर-रहमान लख्वीची जामिनावर सुटका झाल्याने खूपच चिंतित झालो आहोत. आम्ही गेल्या अनेक महिन्यात आणि अगदी कालही पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानी आमची चिंता घातली होती. दहशतवादी हल्ला सर्व देशांच्या सामूहिक सुरक्षेवरील हल्ला आहे. पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा कट रचणारे, त्यासाठी आर्थिक रसद पुरविणारे व तो घडवून आणणाऱ्यांना न्यायालयासमोर आणून कठोर शिक्षा ठोठावण्याचा संकल्प केलेला आहे. सहा अमेरिकींसह या हल्ल्यात मारल्या गेलेल्या १६६ निरपराध नागरिकांना न्याय मिळावा यासाठी पाकने आपला संकल्प पाळावा, असे आवाहन आम्ही करतो. लख्वीच्या सुटकेचे पाकला कोणते परिणाम भोगावे लागतील यावर रात्के यांनी कोणतीही टिपणी केली नाही. ते म्हणाले, आम्ही या घडामोडींविषयी खूपच चिंतित आहोत.