व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:45 IST2025-12-12T13:44:35+5:302025-12-12T13:45:09+5:30
America-Venezuela : अमेरिकेने यांनी व्हेनेजुएलाचे तेलवाहू जहाज जप्त केल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे.

व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
America-Venezuela : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेजुएलाचे तेलवाहू जहाज जप्त केल्यानंतर दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकन नौदलाने कॅरिबियन समुद्रात विशेष कमांडो कारवाई करत हे जहाज आपल्या ताब्यात घेतले होते. ट्रम्प यांनी या कारवाईला मोठी कामगिरी म्हटले, तर व्हेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेवर संप्रभुतेचे उल्लंघन आणि खुली समुद्री चोरी केल्याचा आरोप केला. या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मादुरोंच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत.
पुतिन यांची मादुरोंशी चर्चा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन यांनी गुरुवारी मादुरो यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि व्हेनेजुएलावर वाढत्या बाह्य दबावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हित आणि सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या धोरणाला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेने व्हेनेजुएला किनाऱ्याजवळील तेल टँकर जप्त केल्याच्या एका दिवसानंतर ही चर्चा झाली.
अमेरिकेचे व्हेनेजुएलावर आरोप
अमेरिकेने मादुरो यांच्यावर ‘नार्को-टेररिझम’चे गंभीर आरोप केले आहेत. होमलँड सिक्युरिटी सचिव क्रिस्टी नोएम यांनी काँग्रेससमोर साक्ष देताना टँकर जप्तीला “ड्रग्सविरोधी अभियानाचा भाग” असल्याचे सांगितले. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने गेल्या काही काळात या प्रदेशात आपली सैन्य उपस्थिती वाढवली असून, कथित ड्रग-तस्करीशी संबंधित नौकांवर कारवाया केल्या आहेत. मात्र मादुरोंचा दावा आहे की, अमेरिकेचे खरे उद्दिष्ट त्यांना सत्तेवरून हटवणे आहे. व्हेनेजुएलाने या टँकर जप्तीला खुली चोरी आणि आंतरराष्ट्रीय समुद्री दरोडा म्हटले आहे.
पुतिन यांचा मादुरोंना स्पष्ट पाठिंबा
व्हेनेजुएला सरकारच्या निवेदनानुसार, पुतिन यांनी चर्चेदरम्यान मादुरोंना समर्थन दिल्याचे पुन्हा अधोरेखित केले. ते म्हणाले की, रशिया आणि व्हेनेजुएलातील प्रत्यक्ष संवाद नेहमी खुला राहील आणि आम्ही व्हेनेजुएलाची सार्वभौमता, आंतरराष्ट्रीय कायदा आणि लॅटिन अमेरिकेतील शांततेसाठीच्या त्यांच्या संघर्षाला सातत्याने समर्थन देत राहू. विशेष म्हणजे, दिवंगत राष्ट्राध्यक्ष ह्यूगो चावेझ यांच्या काळापासूनच व्हेनेजुएला आणि रशियाचे संबंध घनिष्ठ राहिले आहेत. रशियाने अनेकदा कठीण काळात व्हेनेजुएलाला मदत केली आहे.