'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:38 IST2026-04-10T11:38:10+5:302026-04-10T11:38:33+5:30

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की त्यांनी नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये. लेबनॉनमधील हल्ल्यांमुळे शांतता चर्चेवर संकट...

'America should not be foolish, should not fall into Netanyahu's trap...'; Iran's direct warning! | 'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!

'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक शांतता चर्चा सुरू होण्यापूर्वीच वातावरणात ठिणगी पडली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेला कडक शब्दांत इशारा दिला असून, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडून मूर्खपणा करू नका, असे बजावले आहे. लेबनॉनवर इस्रायलकडून सुरू असलेल्या भीषण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नेतान्याहूंना तुरुंगात जाण्याची भीती!

अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत नेतान्याहूंवर गंभीर निशाणा साधला. ते म्हणाले, "येत्या रविवारपासून नेतान्याहू यांच्यावरील क्रिमिनल ट्रायल पुन्हा सुरू होत आहे. जर लेबनॉनसह संपूर्ण भागात युद्धविराम झाला, तर नेतान्याहू यांची रवानगी वेगाने तुरुंगात होईल. हीच भीती त्यांना शांतता प्रक्रियेत अडथळे आणण्यास भाग पाडत आहे." नेतान्याहू आपली सत्ता आणि स्वातंत्र्य वाचवण्यासाठी राजनैतिक प्रक्रियेचा बळी देत असल्याचा आरोप अराघची यांनी केला.

'आम्ही युद्धालाही तयार आहोत'

लेबनॉनमध्ये सीझफायरची चर्चा सुरू असतानाच इस्रायलने ३०० हून अधिक लोकांचा बळी घेतल्याने इराण संतप्त झाला आहे. "अमेरिका जर नेतान्याहूंना मुत्सद्देगिरी संपवण्याची परवानगी देत असेल, तर ती त्यांची मर्जी असेल. आम्हाला वाटते की हा एक मूर्खपणा ठरेल, पण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत," असे अराघची यांनी ठणकावून सांगितले.

रशिया, फ्रान्सशी चर्चा; होर्मुझच्या मार्गावर मोठे विधान

अराघची यांनी रशिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जर अमेरिकेने दिलेली आश्वासने पाळली, तर इराण जबाबदारीने वागेल. युद्धविराम करारांतर्गत 'होर्मुझची सामुद्रधुनी' दोन आठवड्यांसाठी जहाजांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित ठेवली जाईल, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कारवाईची मागणी

फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलताना अराघची यांनी इस्रायलकडून होणाऱ्या युद्धविराम उल्लंघनाचा पाढा वाचला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. दुसरीकडे, स्पेनने इराणवर झालेले इस्रायली हल्ले बेकायदेशीर असल्याचे सांगत सर्व बाजूंनी चर्चेचा रस्ता खुला ठेवण्याचे आवाहन केले आहे. आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस या इशाऱ्याला इस्लामाबादमधील बैठकीत कसे प्रत्युत्तर देतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : ईरान की अमेरिका को चेतावनी: नेतन्याहू के जाल में न फंसे।

Web Summary : ईरान ने अमेरिका को लेबनान तनाव के बीच इजरायल की हरकतों के खिलाफ चेतावनी दी, नेतन्याहू पर जेल से बचने के लिए शांति बाधित करने का आरोप लगाया। ईरान हर स्थिति के लिए तैयार है, अमेरिका के वादे निभाने पर होर्मुज जलडमरूमध्य सुरक्षा का प्रस्ताव है। इजरायल के खिलाफ अंतर्राष्ट्रीय कार्रवाई का आग्रह किया गया।

Web Title : Iran warns US: Don't fall into Netanyahu's trap.

Web Summary : Iran cautioned the US against Israel's actions amid Lebanon tensions, accusing Netanyahu of obstructing peace to avoid jail. Iran is ready for any situation, proposing Hormuz Strait safety if US keeps promises. International action against Israel is urged.