america recorded more than 210000 covid 19 cases in 24 hours highest since outbreak | अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 2 लाख नवे रुग्ण; मृतांच्या संख्येनेही मोडला रेकॉर्ड

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 2 लाख नवे रुग्ण; मृतांच्या संख्येनेही मोडला रेकॉर्ड

वॉशिंग्टन - वेगाने पसरणाऱ्याकोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहा कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 65,621,075 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,513,793 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे.  अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत एकाच दिवसात कोरोनचे दोन लाख दहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. तसेच कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

अमेरिकाही हतबल, रुग्णांची संख्या तब्बल एक कोटीवर

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गेल्या 24 तासांत 2 लाख 10 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 2 हजार 907 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही एक कोटी 40 लाख झाली आहे. तर मृतांची संख्या ही दोन लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. येथील रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे. 

कोणतीही लस कोरोनाला पूर्णपणे रोखू शकत नाही, WHO प्रमुखांच्या विधानाने चिंतेत भर

कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे. "जगात कोरोनावर कोणतीही लस तयार केली गेली तरी ती कोरोना महामारी रोखू शकत नाही असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. तसेच "लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल."

"कोरोनाची लस आल्यानंतर ज्याचा आता वापर केला जात आहे ती सर्व सिस्टम रिप्लेस करेल असं होणार नाही" असं देखील म्हटलं आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीच्या सप्लाय चेनबाबतही माहिती दिली आहे. कोरोनाची लस तयार झाल्यास सुरुवातीला ती हेल्थ वर्कर्सला दिली जाईल. त्यानंतर लोकांची प्रायोरिटी ठरवून त्यांना देण्यात येईल. लस आल्यानंतर मृतांच्या संख्येत घट होईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कोरोनावरील लस आल्यानंतर सावध राहणं गरजेचं असल्याचं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. कोरोनाची चाचणी करणं, लक्षणं आढळल्यास स्वत: ला आयसोलेट करणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: america recorded more than 210000 covid 19 cases in 24 hours highest since outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.