डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 05:52 IST2025-10-21T05:52:05+5:302025-10-21T05:52:40+5:30
रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. पण, हे वचन न पाळल्यास मोठ्या टॅरिफचा सामना करावा लागू शकतो, असे ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
वॉशिंग्टन:भारतानेरशियाकडून तेल आयात चालू ठेवल्यास त्यांना सध्याच्या पेक्षा अधिक टॅरिफचा सामना करावा लागेल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पुन्हा एकदा दिली.
रशियाकडून आपण तेल खरेदी करणार नाही, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिले आहे. पण, हे वचन न पाळल्यास भारताला मोठ्या टॅरिफचा सामना करावा लागू शकतो, असे ट्रम्प म्हणाले.
गेल्या आठवड्यात भारताने रशियाचे तेल खरेदी करण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी ट्रम्प यांना पुन्हा रशियन तेल खरेदीचा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी आपल्या धमकीचा पुनरुच्चार केला.
भारत-पाक युद्ध आपणच थांबवल्याचा पुनरुच्चार
भारत-पाकिस्तानला टॅरिफची धमकी दिल्यानंतर त्यांनी त्वरित युद्ध थांबवले आणि या युद्धात सात विमाने पाडली गेल्याचा दावाही ट्रम्प यांनी पुन्हा केला. फॉक्स न्यूज नेटवर्कने त्यांची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत ट्रम्प यांनी आपण युद्ध थांबवले नसते तर दोघांमध्ये अणुयुद्ध झाले असते, अशीही भीती व्यक्त केली.