नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 08:28 IST2025-10-11T08:28:30+5:302025-10-11T08:28:30+5:30
America President Donald Trump News: मारिया मचाडो यांनी मला फोन केला आणि सांगितले की, तुम्ही खरोखरच या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र होता, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
America President Donald Trump News: दक्षिण अमेरिकेतील लोकशाही चळवळीला बळ देणाऱ्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेसाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार आपल्यालाच मिळावा, यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला. नोबेल पुरस्कार हुकल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांचा तोरा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचवले, याचा सर्वांत जास्त आनंद असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आपण तब्बल सात युद्धे थांबवली असल्याच्या बढाया मारत डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी आपणच योग्य असल्याचे वारंवार म्हटले होते. या पुरस्कारासाठी मी पात्र असलो तरी नोबेल समिती कुठलेही भरीव कार्य नसलेल्यालाच हा पुरस्कार देईल, असे सांगत ट्रम्प यांनी त्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे उदाहरण देत टीकाही केली होती. व्हाइट हाऊसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नाराजी बोलून दाखवली.
लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद
नोबेल शांतता पुरस्काराच्या विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी मला फोन केला आणि म्हटले की, तुमच्या सन्मानार्थ मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. कारण तुम्ही खरोखरच या पुरस्कारासाठी पात्र होता. पण मी त्यांना अजिबात म्हणालो नाही की, मला तो पुरस्कार द्या. मला वाटते त्यांनी केले असेल. मी त्यांना शक्य तितकी मदत करत आहे. मला सर्वांत जास्त आनंद या गोष्टीचा आहे की, मी आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचवले.
दरम्यान, आपल्याला मिळालेला पुरस्कार व्हेनेझुएलाचे नागरिक आणि य लढ्याला निर्णायक पाठिंबा देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अर्पण करत असल्याची भावना मचाडो यांनी व्यक्त केली. व्हेनेझुएलातील विखुरलेल्या विरोधी पक्षांना मचाडो यांनी एकत्र आणून लोकशाहीला बळकटी दिली. त्यांना २०२४च्या निवडणुकांत भाग घेण्यास मनाई केली होती. तरीही त्यांचा न्याय्य व शांततापूर्ण संघर्ष सुरू होता.