America President Donald Trump News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत घेतला. पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले केले. दोन्ही देशांतील तणाव वाढत असताना अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकमध्ये युद्धविराम जाहीर केला. यानंतर सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर भाष्य केले. आपणच कसे भारत आणि पाकमधील युद्ध थांबवले. अन्यथा अणुयुद्ध होण्याची भीती होती, असा दावा ट्रम्प यांनी यापूर्वी विविध मंचावरून केला. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानातील युद्धविरामाबाबत दावा केला आहे.
इराण आणि इस्रायल यांच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणच्या अणुतळांवर क्षेपणास्त्रे डागली. यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने कतार येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले. अमेरिका याला उत्तर देणार अशी शक्यता असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्धविराम जाहीर केला. परंतु, दोन्ही देशांनी याला केराची टोपली दाखवत एकमेकांवर हल्ले सुरू ठेवले. अखेर दोन्ही देशांनी आपापल्या विजयाचे दावे करत युद्धबंधी मान्य केली. या घडामोडी सुरू असतानाच पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचा मुद्दा उकरून काढला. ते नेदरलँड येथे बोलत होते.
मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भारत आणि पाकिस्तान. दोन्ही देशांशी सातत्याने फोनवरून संवाद साधत होतो. यावेळेस दोन्ही देशांशी व्यापार करण्यावरच भर दिला. भारत आणि पाकिस्तानातील संघर्ष व्यापार मार्गाने संपवला. मी म्हणालो की, जर तुम्ही एकमेकांशी लढणार असाल, तर आपल्यात कोणताही व्यापार करार होणार नाही. पाकिस्तानचे जनरल गेल्या आठवड्यात माझ्या कार्यालयात होते. पंतप्रधान मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. ते एक चांगले सज्जन गृहस्थ आहेत, ते एक उत्तम माणूस आहेत. मी म्हणालो की, जर तुम्ही लढणार असाल तर आम्ही व्यापार करार करणार नाही. ते म्हणाले, नाही, मला व्यापार करार करायचा आहे. आम्ही अणुयुद्ध थांबवले, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
दरम्यान, पाकचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाकने अमेरिकेला गोंजारण्याचे काम केले. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांना २०२६ चा शांततेसाठी मिळणारा नोबेल पुरस्कार मिळावा अशी शिफारस पाकिस्तानने केली. दुसीरकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. या घटनांसंदर्भात ते आपल्या योगदानाचा दावा करतात. एवढे सारे प्रयत्न करूनही, नोबेल समितीने आपल्याकडे दुर्लक्ष केले, मात्र, जनतेला माहिती आहे आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार न दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.