डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं हवा काढली, युनुस सरकारची झोप उडाली; चालले होते भारताशी पंगा घ्यायला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:28 IST2025-01-22T13:28:11+5:302025-01-22T13:28:45+5:30
भारतासाठी ही एक मोठी संधी असू शकते...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं हवा काढली, युनुस सरकारची झोप उडाली; चालले होते भारताशी पंगा घ्यायला!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक व्यापारात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः बांगलादेशचा वस्त्रोद्योग या निर्णयामुळे संकटात सापडला आहे. बांगलादेश अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कपड्यांची निर्यात करतो. मात्र, आता अमेरिकेने शुल्क लादण्याचा निर्णय घेणे, हा बांगलादेशसाठी आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का आहे.
ट्रम्प यांच्या घोषणेनुसार, आता अमेरिका इतर देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर जकात आणि कर लादणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम बांगलादेशच्या वस्त्र उद्योगावर होणार आहे, जो अमेरिकेला आपली सर्वात मोठी बाजारपेठ मानतो. २०२२ मध्ये, बांगलादेशने अमेरिकेला ११.७ बिलियन डॉलर्सच्या कपड्यांची निर्यात केली होती. या निर्णयानंतर कापड उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे, कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
बांगलादेशची अमेरिकेला होणारी निर्यात दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढली आहे. २०१७ मध्ये ५.८४ बिलियन डॉलर्सची निर्यात असलेली बांगलादेशची निर्यात २०२२ मध्ये ११.७ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली. बांगलादेशची निर्यात प्रामुख्याने कपडे, स्वेटर आणि सूट कापडांमध्ये होते. परंतु ट्रम्प यांच्या नवीन आर्थिक निर्णयामुळे या वाढीला खीळ बसू शकते. नव्हे कारखानेही बंद पडू शकतात.
भारतासाठी संधी -
भारतासाठी ही एक मोठी संधी असू शकते. ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयानंतर भारताला अमेरिकेसाठी कपड्यांचा पर्यायी पुरवठादार बनण्याची संधी आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी, भारताच्या वस्त्रोद्योगाला आपली उत्पादन क्षमता वाढवावी लागेल आणि अमेरिकन बाजारपेठेत आपला वाटा वाढवण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील.