अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले, ‘टॅरिफ’ला ९० दिवसांचा ब्रेक; चीनवर मात्र १२५ टक्के कराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 00:26 IST2025-04-10T00:21:35+5:302025-04-10T00:26:46+5:30

America President Donald Trump Pause Tariffs: ७५ देशांना टॅरिफमधून ९० दिवसांची सूट देतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत चीनवरील कर १२५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

america president donald trump announces 90 day pause on tariffs except for china which is being raised to 125 percent | अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले, ‘टॅरिफ’ला ९० दिवसांचा ब्रेक; चीनवर मात्र १२५ टक्के कराची घोषणा

अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले, ‘टॅरिफ’ला ९० दिवसांचा ब्रेक; चीनवर मात्र १२५ टक्के कराची घोषणा

America President Donald Trump Pause Tariffs: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या टॅरिफ प्लानमुळे नव्या संकटात सापडले. यामुळे जागतिक स्तरावरील शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले. भारतही यातून सुटला नाही. भारतीय शेअर बाजारातही याचे प्रचंड पडसाद पाहायला मिळाले. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल १९ लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचा अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. यानंतर आपल्या आडमुठ्या भूमिकेपासून आता डोनाल्ड ट्रम्प काहीसे नरमले असून, ही टॅरिफ योजना ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या टॅरिफ योजनेला स्थगिती देण्यास डोनाल्ड ट्रम्प अजिबातच तयार नव्हते. परंतु, अमेरिकेसह जगभरातील बहुतांश बड्या देशांनी गेल्या काही दिवसांपासून लावलेल्या तगाद्यामुळे आपल्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी फेरविचार केला. ट्रम्प यांनी घोषणा केली की, ज्या ७५ देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना व्यापार चर्चेसाठी बोलावले आहे, त्यांना ९० दिवसांची टॅरिफ स्थगिती आणि परस्पर शुल्कात घट करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेसोबत व्यापार चर्चा करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता अमेरिका आणि चीनमधील करयुद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

चीनवरील कर १२५ टक्क्यांपर्यंत वाढवत असल्याची घोषणा

जागतिक बाजारपेठेप्रती चीनने दाखवलेल्या अनादरामुळे अमेरिका चीनवर आकारलेला कर १२५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहे, जो तात्काळ लागू होईल. आशा आहे की, नजीकच्या भविष्यात चीनला समजेल की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस आता स्वीकारार्ह नाहीत, असे स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच ७५ हून अधिक देशांनी वाणिज्य विभाग, कोषागार आणि यूएसटीआरमधील अमेरिकेच्या प्रतिनिधींना, व्यापार, व्यापारातील अडथळे, दर या संबंधित विषयांवर तोडगा काढण्यासाठी बोलावले आहे. या देशांनी कोणत्याही प्रकारे अमेरिकेला प्रत्युत्तर दिलेले नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेता त्या देशांच्या टॅरिफ प्लानला ९० दिवसांची स्थगिती देत आहे. तसेच या कालावधीत १० टक्के कर कमी करण्याचा अधिकार संबंधित विभागांना मी दिला आहे, जो तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केले आहे.

अमेरिकेने केली चीनवर कुरघोडी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर व्हाईट हाऊसने चीनवर तब्बल १०४ टक्के टॅरिफ (जशास तसा) कर लादला आहे. चीनने अमेरिकेवर लादलेला ३४ टक्के कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त ५० टक्के कर लादला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ती धमकी ट्रम्प यांनी खरी करून दाखविली आहे. यानंतर आता अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध नव्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०४ टक्क्यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के एवढा टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन वस्तू्ंवर लावण्यात आलेले हे अतिरिक्त टॅरिफ १० एप्रिलपासून लागू होईल. यावरही आता अमेरिकेने कुरघोडी करत चीनवर १२५ टक्के कर लावणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारताकडून लावण्यात येणारे शुल्क हे प्रामुख्याने चुकीच्या व्यापार प्रथा आणि डम्पिंगसारख्या स्थितीविरोधात संरक्षणासाठी आहे. अमेरिकेवर भारताचा एकूण टॅरिफ सुमारे १७ टक्के आहे. पण यातील मोठा भाग अशा वस्तूंवर आहे ज्या भारत आयात करतच नाही. त्यामुळे अमेरिकेवर आपला प्रभावी टॅरिफ सुमारे ७ ते ८ टक्के बसतो. हे शुल्क फारसे नाही. चीनच्या चुकीच्या व्यावसायिक धोरणांमुळे सध्याची गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

 

Web Title: america president donald trump announces 90 day pause on tariffs except for china which is being raised to 125 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.