America Praises India : अमेरिका खूश! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान केलं भारताचं कोतुक; PM मोदींचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 10:39 IST2022-03-03T10:38:10+5:302022-03-03T10:39:09+5:30
"आजपासून पाच वर्षांनी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. भारत ही जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या वर्षी ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी महत्वाची अर्थव्यवस्था होती."

America Praises India : अमेरिका खूश! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान केलं भारताचं कोतुक; PM मोदींचे मानले आभार
रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये अनुपस्थित राहून, भारत सातत्याने आपल्या सर्वात जुन्या मित्राला पाठिंबा देत आहे. साहजिकच, ही गोष्ट अमेरिकेला खटकणारी आहे. पण तरीही, ज्यो बायडेनपासून ते अनेक अधिकारी आणि सिनेटर्सपर्यंत, सर्व जण भारतासोबतची आपली मैत्री मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दोन्ही देशांमधील वाढत्या मैत्रीसाठी अमेरिका भारतातील लोक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आभारी आहे, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ सिनेटरने म्हटले आहे. निअर इस्ट, दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि दहशतवादविरोधी सिनेट फॉरेन रिलेशन्स उपसमितीचे अध्यक्ष सिनेटर ख्रिस मर्फी म्हणाले, "अमेरिका-भारत संबंध खरोखरच कधीही मजबूत राहिलेले नाहीत. संयुक्त राज्य अमेरिका आपल्या वाढत्या मैत्रीसाठी भारतातील लोक आणि पंतप्रधान मोदी यांची आभारी आहे."
भारत-अमेरिका संबंधांवर सिनेटर्स काँग्रेसच्या सुनावणीदरम्यान बोलताना, कनेक्टिकटमधील डेमोक्रॅटिक सिनेटर आपल्या सुरुवातीच्या टिप्पण्यांमध्ये म्हटले, चांगल्या कारणाने द्विपक्षीय संबंध वाढत आहेत. आजपासून पाच वर्षांनी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. भारत ही जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या वर्षी ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी महत्वाची अर्थव्यवस्था होती.
भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सैन्य -
मर्फी म्हणाले, भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. जागतिक महामारीच्या काळात भारताचा बायोफार्मास्युटिकल उद्योग वाढला आहे. अमेरिकेसह उर्वरित जगाला भारताने PPE किट पुरवल्या आणि लसींचा प्रमुख उत्पादक म्हणूनही भारत उदयास आला आहे. तसेच, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला हा देश निश्चितपणे अमेरिकेसाठी अत्यंत फायद्याचा ठरेल, असेही ते म्हणाले.