अमेरिका, इस्रायलचे इराणच्या १० हजार ठिकाणी हल्ले; संघर्ष थांबविण्याच्या प्रयत्नांना यश नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:09 IST2026-03-27T08:08:05+5:302026-03-27T08:09:21+5:30
दोन्हीही बाजू झाल्या अधिक आक्रमक

अमेरिका, इस्रायलचे इराणच्या १० हजार ठिकाणी हल्ले; संघर्ष थांबविण्याच्या प्रयत्नांना यश नाही
दुबई : पश्चिम आशियात युद्धविरामाचे प्रयत्न फळाला येत नसून इराण, अमेरिकेने गुरुवारी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड आणखी घट्ट करण्यावर इराणने लक्ष केंद्रित केले असून, या प्रदेशात अमेरिकेने आणखी सैन्य आणण्यासाठी पावले उचलली. इस्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारीपासून इराणच्या १०,००० हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले आहेत.
इस्रायलमध्ये बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी पहाटे इराणी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांचा सायरन वाजवून इशारा देण्यात आला. संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे हल्ला रोखण्याच्या प्रयत्नांत क्षेपणास्त्रांचे अवशेष अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत टोल बूथसारखी व्यवस्था लागू केल्याची माहिती मिळाली असून, काही जहाजे होर्मूझ सामुद्रधुनीतून जाण्यासाठी चिनी युआनमध्ये इराणला पैसे देत आहेत.
या सामुद्रधुनीत इराणने केलेली कोंडी फोडण्यासाठी यूएसएस त्रिपोली या युद्धनौकेसह अमेरिकेच्या २५०० सैनिकांची तुकडी पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे, तसेच ८२ व्या एअरबोर्नमधील किमान १,००० पॅराट्रपर्सनाही या भागात पाठवण्याचे आदेश अमेरिकी सरकारने दिले आहेत. इराणच्या खार्ग बेटावरील तेल टर्मिनल किंवा सामुद्रधुनीजवळील इतर ठिकाणांवर ताबा मिळवण्यावर अमेरिकेने लक्ष केंद्रित केले आहे.
इराणची ९२ टक्के मोठी जहाजे केली नष्ट
अमेरिकन नौदलातील अॅडमिरल ब्रेड कूपर यांनी सांगितले की, इस्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झाल्यापासून त्यांच्या सैन्याने १०,००० हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले असून, इराणच्या मोठ्या जहाजांपैकी ९२ टक्के आणि क्षेपणास्त्र, ड्रोन व नौदल उत्पादन सुविधांपैकी दोन-तृतीयांशाहून अधिक गोष्टी नष्ट केल्या आहेत. आमचे काम अजून संपलेले नाही. आम्ही इराणच्या लष्करी यंत्रणेचा पूर्णपणे नाश करणार आहोत.