"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 08:53 IST2025-12-05T08:53:27+5:302025-12-05T08:53:57+5:30
डेर स्पीगल रिपोर्ट आणि एएफपीच्या हवाल्याने लीक झालेल्या कॉलमध्ये युरोपियन नेत्यांनी युक्रेन रशिया युद्ध संपवण्याच्या अमेरिकन प्रयत्नांवर अविश्वास दाखवला आहे.

"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्ज यांच्या एका कॉलनं युरोपियन नेत्यांचा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरवसा नसल्याचं उघड झालं आहे. या कॉल लीकमुळे जागतिक चर्चा सुरू झाली आहे. जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्ज यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना सावध केले आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला खूप सतर्क राहण्याची गरज आहे. अमेरिका खेळ करत आहेत, तुमच्यासोबत आणि आमच्यासोबतही असं मर्ज यांनी कॉलवरून सांगितले. जर्मन चांसलरचा हा फोन कॉल युरोपपासून अमेरिका, रशियापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.
डेर स्पीगल रिपोर्ट आणि एएफपीच्या हवाल्याने लीक झालेल्या कॉलमध्ये युरोपियन नेत्यांनी युक्रेन रशिया युद्ध संपवण्याच्या अमेरिकन प्रयत्नांवर अविश्वास दाखवला आहे. यामुळे पाश्चात्या आघाडीत वाढलेला तणाव प्रखरतेने दिसून आला आहे. जर्मन न्यूज वीकलीन म्हटलं की, आम्हाला युक्रेनचे राष्ट्रपती व्हालोडिमिर झेलेन्स्की आणि अनेक युरोपियन देशातील राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेले कॉन्फरन्स कॉलचे लिखित नोट्स मिळाले आहेत. जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्ज आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी कथितपणे अमेरिकेकडून सुरू असणाऱ्या रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
सुरक्षेच्या हमीशिवाय कुठलीही स्पष्टता नसल्यास अमेरिका युक्रेनला भूभागावरून फसवणूक करण्याची शक्यता आहे असं फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी म्हटलं. तर येणाऱ्या काळात तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. अमेरिका तुमच्या आणि आमच्या दोघांसोबत गेम करत आहे असं जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्ज यानी झेलेन्स्की यांना म्हटलं. यावर गोपनीयतेचा हवाला देत जर्मन चांसलर कार्यालयाने कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. लीक झालेल्या कॉल रेकॉर्डमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय उद्योगपती स्टीव विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याबाबतही साशंकता वर्तवली, जे अलीकडेच क्रेमलिनला गेले होते.
दरम्यान, फिनलँडचे राष्ट्रपती अलक्झेंडर स्टब यांनी आम्ही युक्रेन आणि व्होलोडिमिर यांना या लोकांसह एकटे सोडू शकत नाही असं म्हटलं. या लीक कॉलमध्ये NATO चे सेक्रेटरी जनरल मार्क रूट यांचाही उल्लेख झाला आहे. ज्यांनी त्यांनी नेत्यांना युक्रेनच्या हिताचं रक्षण करायला हवे असं आवाहन केले आहे. एका नाटो अधिकाऱ्यांनी या लीक कॉलवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.