“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:43 IST2026-04-08T09:40:29+5:302026-04-08T09:43:50+5:30
Israel On America Iran Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रबंधीची घोषणा झाल्यावर इस्रायलने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
Israel On America Iran Ceasefire: अखेर अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली. दोन आठवड्यांसाठी ही शस्त्रसंधी लागू असणार आहे. अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भूमिकेत अचानक बदल केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली. दोन आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि इतर आक्रमणे स्थगित करण्यास सहमत आहे. सर्वसमावेशक युद्धविरामाच्या दिशेने एक पाऊल आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून एक दहा कलमी प्रस्ताव अमेरिकेला पाठवला आहे. यानंतर आता इस्रायलने भूमिका स्पष्ट केली आहे.
अहिंसेची वचनबद्धता, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम ठेवणे, युरेनियम संवर्धनाला मान्यता, सर्व प्राथमिक निर्बंध हटवणे, सर्व दुय्यम निर्बंध हटवणे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व ठराव रद्द करणे, नियामक मंडळाचे सर्व ठराव रद्द करणे, इराणला नुकसान भरपाई देणे, या प्रदेशातून अमेरिकी सैन्य मागे घेणे, लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्धच्या लढाईसह सर्व आघाड्यांवर युद्धविराम, अशा १० मुद्द्यांचा या प्रस्तावात समावेश आहे. परंतु, यातील काही मुद्द्यांना इस्रायलचा आक्षेप असल्याचे म्हटले जात आहे.
लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्धची लढाई सुरूच राहणार
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने बुधवारी सांगितले की, अमेरिका आणि इराण या दोन देशांत दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी करार झाला असला तरी, इस्रायलची लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध जी लढाई सुरू आहे, त्यासाठी हा करार लागू नसेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा आहे. इराणने तत्काळ होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी. अमेरिका, इस्रायल तसेच या प्रदेशातील इतर देशांवरील सर्व हल्ले थांबवावेत, अशी मागणी इस्रायलने केली आहे.
दरम्यान, अमेरिका, इस्रायल, आखाती देशांसह जगाला यापुढे आण्विक, क्षेपणास्त्र आणि दहशतवादी धोका निर्माण होऊ नये, हे सुनिश्चित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. तसेच अमेरिका, इस्रायल आणि इस्रायलच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांनी सामायिक केलेली ही उद्दिष्ट्ये आगामी वाटाघाटींमध्ये साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहेत. परंतु, दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी करार लेबनॉनला लागू होत नाही, हे इस्रायलने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे.