शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 05:35 IST2025-10-02T05:35:07+5:302025-10-02T05:35:44+5:30
अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे.

शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि काँग्रेस बुधवारच्या अंतिम मुदतीपर्यंत सरकारी कार्यक्रम आणि सेवा सुरू ठेवण्यासाठी करार करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर सरकारी शटडाऊन सुरू झाले असून, यामुळे अमेरिका अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. यामुळे देशभरातील ७,५०,००० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.
अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे.
वादाचा ठिणगी अशी पडली
रिपब्लिकन पक्ष कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. ट्रम्प यांनी विरोधी पक्षाचा उपहास करणारे, वंशविद्वेषी ठरलेले एक व्हिडिओ प्रसारित केल्याने वातावरण आणखी तापले. उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी सांगितले की, लष्करी कर्मचारी बिनपगाराने काम करतील, उड्डाण व्यवस्थेत अडथळे येतील, अन्नधान्य योजना थांबेल.
सर्वांत मोठा शटडाऊन
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ३५ दिवसांचा, इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन झाला होता. २०१३ मध्ये ओबामांच्या कार्यकाळात ‘ओबामाकेअर’वरून १६ दिवसांचे शटडाऊन झाले होते.
अर्थकारणाला धक्का
या शटडाऊनचा देशव्यापी आर्थिक परिणाम होईल. गोल्डमन सॅक्ससह अनेक वित्तीय संस्थांनी आधीच्या शटडाऊनना बाजाराने तितका धक्का बसत नसल्याचे म्हटले असले, तरी या वेळी परिस्थिती गंभीर होऊ शकेल, असा इशारा दिला आहे. ट्रम्प यावर लवकरच तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहेत.