"त्यांची भारतात बिझनेस करण्याची इच्छा आहे, पण...!"; मोदी-मस्क भेटीवर हे काय बोलून गेले ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 03:34 IST2025-02-14T03:33:43+5:302025-02-14T03:34:38+5:30
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला माहीत आहे की, त्यांना भारतात बिझनेस करायचा आहे. पण..."

"त्यांची भारतात बिझनेस करण्याची इच्छा आहे, पण...!"; मोदी-मस्क भेटीवर हे काय बोलून गेले ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी ब्लेअर हाऊस येथे स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्यासोबत चर्चा केली. या दोहोंमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यासंदर्भात बोलताना, "इलॉन मस्क पंतप्रधान मोदींना का भेटले हे आपल्याला माहीत आहे. त्यांना भारतात बिझनेस करायचा आहे," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला माहीत आहे की, त्यांना भारतात बिझनेस करायचा आहे. पण व्यवसायासाठी भारत फार कठीण ठिकाण आहे. तेथे सर्वाधिक टॅरीफ (कर) आहे. बिझनेस करण्यासाठी ते एक कठीण ठिकाण आहे." खरे तर, आपली इंटरनेट सॅटेलाइट सर्व्हिस स्टारलिंक भारतात लॉन्च करण्याची इलॉन मस्क यांची इच्छा आहे. मात्र, त्यांना अद्याप यश मिळालेले नाही.
मस्क यांच्या भेटीनंतर काय म्हणाले मोदी? -
मस्क यांच्या भेटीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "वॉशिंगटन डीसीमध्ये इलॉन मस्क यांच्यासोबत चांगल्या प्रकारे बैठक पार पडली. आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यात मस्क यांच्या आवडीच्या, स्पेस, मोबिलिटी, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन आदी मुद्द्यांचा समावेश होता. याशिवाय मी सुधारणा आणि 'किमान सरकार, कमाल प्रशासना'च्या दिशेने भारताच्या प्रयत्नांवरही चर्चा केली."
कुटुंबीयांसह आले होते मस्क -
यावेळी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आपल्या कुटंबासह पोहोचले होते. ते आपल्या मुलांच्या हातात हात टाकून पंतप्रधआन मोदींच्या भेटीसाठी आले होते. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे अत्यंत निकटवर्ती नेते विवेक रामास्वामी देखील पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी आले होते.