अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:30 IST2025-10-21T16:29:05+5:302025-10-21T16:30:04+5:30
ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाच्या 1 लाख डॉलर (सुमारे ₹88 लाख) फीवर सूट जाहीर केली आहे.

अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
America H-1B Visa: अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीय टेक प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाच्या 1 लाख डॉलर (सुमारे ₹88 लाख) फीवर सूट जाहीर केली आहे. या निर्णयाचा फायदा विशेषतः भारतीय व्यावसायिक, सध्याचे व्हिसाधारक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे.
कोणाला मिळणार फी माफी?
यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) च्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ही फी विद्यमान व्हिसाधारकांवर लागू होणार नाही. यात F-1 विद्यार्थी व्हिसा धारक, L-1 इंट्रा-कंपनी ट्रान्सफरी आणि H-1B व्हिसाचे नूतनीकरण किंवा विस्तारासाठी अर्ज करणाऱ्या व्यावसायिकांचा यांचा समावेश आहे. तसेच, 21 सप्टेंबर 2025 पूर्वी सादर केलेल्या कोणत्याही अर्जावर ही फी लागू होणार नाही.
USCIS ने स्पष्ट केलं आहे की, H-1B व्हिसाधारकांना आता अमेरिकेच्या आत-बाहेर प्रवासासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय, F-1 विद्यार्थी व्हिसावरुन H-1B व्हिसामध्ये बदल करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही ही फी भरावी लागणार नाही.
भारतीयांना सर्वाधिक फायदा
H-1B व्हिसाधारकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या सुमारे 3 लाख भारतीय अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करत आहेत. दरवर्षी मिळणाऱ्या नवीन H-1B व्हिसांपैकी 70% भारतीयांना, तर 11–12% चीनी नागरिकांना मिळतात.
H-1B व्हिसा हा उच्च कौशल्य असलेल्या कामगारांसाठी आहे, ज्यामध्ये तीन वर्षे अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते आणि ती आणखी तीन वर्षांनी वाढवता येते. दरवर्षी 85,000 नवीन व्हिसा लॉटरी सिस्टमद्वारे दिले जातात.