'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 23:54 IST2025-06-06T23:53:57+5:302025-06-06T23:54:21+5:30
"आता इलॉन मस्क यांची आपल्यासोबत बोलण्याची इच्छा आहे. मात्र आपण चर्चेसाठी तयार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे..."

'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांच्यातील वाद वाढल्यानंतर, आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान हे दोन्ही नेते एकमेकांची प्रचंड स्तुती करत होते. ते आता उघडपणे समोरा-समोर आले आहेत. यातच, आता इलॉन मस्क यांची आपल्यासोबत बोलण्याची इच्छा आहे. मात्र आपण चर्चेसाठी तयार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय' -
एबीसी न्यूज चॅनलला शुक्रवारी दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, इलॉन मस्क यांचे डोके फिरले आहे. तत्पूर्वी, वृत्त आले होते की, व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी वाद संपवण्यासाठी ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात ६ जून रोजी बैठकीचे नियोजन केले आहे. मात्र, जेव्हा ट्रम्प यांना या बैठकीच्या वेळापत्रकासंदर्भात विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी इलॉन मस्क यांना भेटण्यास नकार दिला.
उघडपणे समोरा समोर आले आहेत ट्रम्प-मस्क -
ट्रम्प गुरुवारी म्हणाले होते, आपण इलॉन मस्क यांना बरीच मदत केली आहे. मात्र आपण आता मस्क यांच्यावर नाराज आहोत. त्यांनी दावा केला की, मस्क ईव्ही टॅक्स इन्सेटिव्ह हटवल्याने नाराज आहेत. यावर, मस्क यांनी दावा केला की, या विधेयकासंदर्भात आपल्याला एकदाही माहिती देण्यात आली नाही आणि ते मध्यरात्री पासही करण्यात आले. एवढेच नाही तर, माझ्यामुळेच ट्रम्प निवडणूक जिंकले. जर मी नसतो, तर ट्रम्प यांचा पराभव निश्चित होता, असेही मस्क यांनी म्हटले होते.