अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर निर्णयांविरोधात अमेरिकेचे हजारो नागरिक रस्त्यावर आले आहेत. शनिवारी ट्रम्प यांच्याविरोधात त्यांच्या निर्णयांनी त्रासलेल्या लोकांनी दुसरे मोठे आंदोलन केले. एएफपीने याचे वृत्त दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकल्यानंतर आधी अमेरिकेतून लाखो सरकारी लोकांना नोकरीवरून काढून टाकले होते. खर्च कमी करण्याचा उद्देश यासाठी देण्यात आला होता. हे होत नाही तोच त्यांनी जगाकडे मोर्चा वळविला होता. त्यांनी अमेरिकन लोकांना खाण्यापिण्यापासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पुरविणाऱ्या देशांवर जादा टेरिफ लादले आहे. जगातील सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या चीनसोबत तर युद्धच सुरु केले आहे. यामुळे अमेरिकन लोक त्रस्त झाले आहेत आणि ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत.
न्यूयॉर्कच्या मुख्य लायब्ररीच्या बाहेरील चौकात हजारो लोक रस्त्यावर आले आहेत. त्यांनी अमेरिकेचा कोणी राजा नाहीय, अत्याचाराचा प्रतिकार करा अशा घोषणा लिहिलेले पोस्टर हातात झळकवून आंदोलन केले आहे. या आंदोलकांचा बहुतांश रोख हा ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणांविरुद्ध होता. नो आयसीई, नो फियर, स्थलांतरितांचे येथे स्वागत आहे, असे देखील पोस्टर झळकत होते.
घटनात्मक तत्त्वांचे, विशेषतः योग्य प्रक्रियेच्या अधिकाराचे, उल्लंघन केल्याचा आरोप वॉशिंग्टन डीसी येथील आंदोलकांनी केला.
आम्ही मोठ्या संकटात आहोत. माझ्या आई वडिलांनी हिटलरच्या उदयाबात ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या ट्रम्प युगाशी देखील जुळत आहेत. फरक एवढाच आहे की हिटलर किंवा अन्य फॅसिस्ट नेत्यांपेक्षा ट्रम्प जास्त मूर्ख आहेत. त्यांनी स्वत:च्या देशातच फूट पाडली आहे, असा आरोप ७३ वर्षांच्या कॅथी व्हॅली यांनी केला आहे.