व्हेनेझुएला अन् इराणनंतर क्यूबा अमेरिकेच्या निशाण्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने तणाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 14:07 IST2026-03-29T14:05:27+5:302026-03-29T14:07:21+5:30
America-Cuba: अमेरिका आणि क्युबामध्ये नेमका वाद काय? जाणून घ्या...

व्हेनेझुएला अन् इराणनंतर क्यूबा अमेरिकेच्या निशाण्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने तणाव वाढला
America-Cuba: व्हेनेझुएला आणि इराणनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर क्यूबा देश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील एका वर्षात ट्रम्प यांनी क्यूबाला अनेक वेळा धमक्या दिल्या असून, नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात त्यांनी व्हेनेझुएलानंतर पुढचा नंबर क्यूबाचा असू शकतो, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्हेनेझुएलावर अमेरिकेचा मोठा हल्ला
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या तिन्ही सैन्य दलांनी एकत्रितपणे व्हेनेझुएलावर मोठा हल्ला केला होता. अचानक झालेल्या या हल्ल्याला व्हेनेझुएला प्रभावी उत्तर देऊ शकला नाही. या कारवाईनंतर सर्वात धक्कादायक घडामोड म्हणजे, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन अमेरिकेत नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर अमेरिकेत खटला सुरू आहे.
व्हेनेझुएलानंतर क्यूबावर धोका
व्हेनेझुएलावर कारवाई झाल्यानंतर आता सर्वाधिक धोका क्यूबावर असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी गेल्या वर्षभरात किमान 10 वेळा क्यूबाला धमकी दिली आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा व्हेनेझुएलानंतर पुढचा नंबर क्यूबाचा असू शकतो असे म्हटले आहे. दरम्यान, क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डियाज-कॅनेल यांनी अमेरिकेच्या धमक्यांना उत्तर देताना देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
President Trump: 🇺🇸🇨🇺 CUBA IS NEXT
— Donald J Trump Posts TruthSocial (@TruthTrumpPost) March 27, 2026
But pretend I didn't say that, please. Pretend I didn't say that. Please, please, please, media, please disregard that statement. pic.twitter.com/O0a9BqUMK3
क्यूबा आधीच आर्थिक संकटात
सध्या क्यूबा गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. व्हेनेझुएलाकडून मिळणारी तेल पुरवठा बंद झाल्यामुळे क्यूबामध्ये इंधनाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर क्यूबाला मिळणारा मोठा ऊर्जा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. अशातच, 16 मार्च रोजी क्यूबामध्ये मोठा ब्लॅकआउट झाला होता, ज्यामुळे लाखो लोक प्रभावित झाले. गेल्या चार महिन्यांत तीन मोठ्या वीज प्रकल्पांवर संकट निर्माण झाले आहे. व्हेनेझुएलाकडून सुमारे 30 टक्के तेल पुरवठा बंद झाल्यामुळे क्यूबाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 15 टक्के घट नोंदवली गेली आहे.
अमेरिका-क्यूबा 67 वर्षांचे जुने वैर
अमेरिका आणि क्यूबा यांच्यातील संघर्षाचा इतिहास सुमारे 67 वर्षे जुना आहे. 1959 मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी क्रांती करून क्यूबामध्ये सत्ता स्थापन केली आणि अमेरिकन कंपन्यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर क्यूबाने सोव्हिएत संघाशी मैत्री केली. यामुळे अमेरिकेने क्यूबावर आर्थिक निर्बंध लादले, जे आजही कायम आहेत. 1962 मध्ये क्यूबन मिसाईल संकटामुळे जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. तेव्हापासून अमेरिका क्यूबाला कम्युनिस्ट धोका मानत आली आहे.
क्यूबावर अमेरिकेचा रोष का?
अमेरिकेचे म्हणणे आहे की, क्यूबा रशिया, चीन आणि इराण यांसारख्या देशांशी जवळीक ठेवतो आणि काही दहशतवादी गटांना समर्थन देतो. त्यामुळे अमेरिकेने क्यूबाला अमेरिकेसाठी मोठा धोका घोषित करणारा आदेशही जारी केला आहे.
"युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट; अफवांवर विश्वास ठेवू नका, एकजुटीने संकटाचा सामना करू"- PM मोदी
तणाव मोठ्या युद्धात बदलण्याची भीती
व्हेनेझुएलावर कारवाई आणि क्यूबाबाबत अमेरिकेचा आक्रमक पवित्रा यामुळे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत अस्थिरता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला भीती आहे की, हा तणाव मोठ्या सैनिकी संघर्षात बदलू शकतो. आगामी काळात अमेरिकेची रणनीती आणि क्यूबाची प्रतिक्रिया यावर या संकटाची दिशा अवलंबून असेल.