आश्चर्यजनक! इरमा चक्रीवादळामुळे फ्लोरिडाचे किनारे झाले कोरडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:49 IST2017-09-11T13:40:09+5:302017-09-11T13:49:34+5:30
कॅटरिनाप्रमाणे शक्तीशाली असणाऱ्य़ा इरमासारख्या वादळांमध्ये तात्कालिक आणि कायमचे बदल घडवून आणण्याची शक्ती असते. त्यातीलच एक तात्पुरता परिणाम अमेरिकेच्या पूर्वकिनाऱ्यांवर दिसून येत आहे.

आश्चर्यजनक! इरमा चक्रीवादळामुळे फ्लोरिडाचे किनारे झाले कोरडे
फ्लोरिडा, दि.11- अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या इरमा चक्रीवादळामुळे किनाऱ्यावरील पाणीच मागे गेल्याच्या घटना घडत आहेत. कॅटरिनाप्रमाणे शक्तीशाली असणाऱ्य़ा इरमासारख्या वादळांमध्ये तात्कालिक आणि कायमचे बदल घडवून आणण्याची शक्ती असते. त्यातीलच एक तात्पुरता परिणाम अमेरिकेच्या पूर्वकिनाऱ्यांवर दिसून येत आहे. या वादळांमध्ये एका जागेचे पाणी पूर्ण शोषून शेकडो मैल दूर अंतरावर घेऊन जाण्याचीही ताकद असते. फ्लोरिडाच्या किनाऱ्यांवर असेच बदल दिसून येत आहे. समुद्राचे पाणी नेहमीच्या जागेपेक्षा काही मैल मागे गेल्याचे धक्कादायच चित्र येथे दिसत आहे. अशा घटना अत्यंत दुर्मिळ असतात. फॉरेवर फ्लरिश नावाच्या ट्वीटर हॅंडलवरुन याचा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर काही क्षणांत त्याचे हजारो रिट्विटस होऊ लागले. तसेच थोड्याच वेळात त्याची माहिती सर्वदूर पसरू लागली.
I am in disbelief right now... This is Long Island, Bahamas and the ocean water is missing!!! That's as far as they see #HurricaneIrma wtf pic.twitter.com/AhPAonjO6s
— #ForeverFlourish (@Kaydi_K) September 9, 2017
इरमा वादळामुळे 10 कॅरेबियन देश तसेच अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला सर्वाधीक तडाखा बसलेला आहे. सध्या वाऱ्याचा वेग 137 किमी प्रती तास झाल्यानंतर या वादळाची वर्गवारी 3 मधून वर्गपर्यंत कमी करण्यात आली आहे. या वादळामुळे 34 लाख घरांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तसेच मायामीमधील बरेच भाग पाण्याखाली गेले आहेत. या वादळामुळे आतापर्यंत 28 जणांचे प्राण गेल्याचे नोंदवण्यात आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडाला आणीबाणी पातळीवर सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले असून या वादळाचे वर्णन त्यांनी बिग मॉन्स्टर असे केले आहे. या वादळाचा मोठा तडाखा टाम्पा बे एरियाला बसला आहे. या परिसरामध्ये 30 लाख लोक राहतात. 1921 पासून टाम्पा बे एरियाला वादळाचा तडाखा बसला नव्हता. आता जवळजवळ साडेनऊ दशकांनंतर पुन्हा इतकी मोठी हानी होण्याची वेळ आली आहे.