आजुबाजुची घरे, गाड्या, झाडे जळून खाक झाली, कॅलिफोर्नियाच्या आगीत एकटेच घर वाचले; मालक म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:22 IST2025-01-15T16:22:34+5:302025-01-15T16:22:55+5:30
इंटरनेटवर या घराचे फोटो व्हायरल होत आहेत. आगीच्या या तांडवात हे घर कसे वाचले असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

आजुबाजुची घरे, गाड्या, झाडे जळून खाक झाली, कॅलिफोर्नियाच्या आगीत एकटेच घर वाचले; मालक म्हणतो...
कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीने हजारो घरे, हजारो एकर जंगल, इमारती नष्ट करून टाकल्या आहेत. जिविताची हानी कमी झालेली असलेली तरी वित्त हानी एवढी आहे की अमेरिकेला त्यातून सावरण्यासाठी खूप हातपाय मारावे लागणार आहेत. मुळात अमेरिकेची घरे ही लाकूड, फोमपासून बनविली जातात. यामुळे या आगीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरे भस्मसात केली आहेत. परंतू, एक असे घर आहे ज्याच्या आजुबाजुला, कंपाऊंडमधील कार, झाडे जळून खाक झाली तरी ते दिमाखात उभे आहे.
इंटरनेटवर या घराचे फोटो व्हायरल होत आहेत. आगीच्या या तांडवात हे घर कसे वाचले असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अमेरिकेच्या टिकटॉक युजरने त्याच्यासोबत घडलेल्या या अनन्यसाधारण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. हे घर त्याच्या मालकीचे आहे. तो देखील हे पाहून शॉक झाला आहे. लोक त्याला पृथ्वीवरील एकमेव भाग्यवंत असल्याचे म्हणत आहेत.
या व्हिडीओमध्ये घर मालकाने आजुबाजुचा बेचिराख परिसर दाखविला आहे. माझे घर सोडून माझ्या कॉलनीतील सर्व घरे जळाली आहेत. कसे झाले असे ते माहिती नाही परंतू माझेच घर वाचण्यामागे कोणतीतरी दैवी शक्ती आहे. मी त्यासाठी लायक नाही. परंतू देवाने सर्वांना पुन्हा घरे बांधण्यासाठी भरपूर विमा द्यावा, असे या व्यक्तीने डोळ्यांत अश्रू आणून म्हटले आहे.
माझा विमा होता की नाही हे मला माहित नाही. मी पैसे दिले की नाही हे देखील मला तपासावे लागेल. पण देवाला ते माहित होते आणि म्हणूनच त्याने माझे रक्षण केले. माझ्या मागे असलेले सगळी घरे जळून खाक झाली आहेत. सगळी लाकडेही जळून गेली. पण माझं घर अजूनही सुरक्षित आहे. जर देव नसेल तर हे कसे घडू शकते? शेजारी निघून गेले. गॅरेज अजूनही उभे आहे, असे कसे झाले, अशा शब्दांत त्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.