Airplane: विमान हवेत असताना वैमानिक अडकला टॉयलेटमध्ये, प्रवाशांची झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:22 IST2022-06-13T17:22:05+5:302022-06-13T17:22:34+5:30
Airplane: विमान प्रवासचा आनंद घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र विमानामधील एखादी छोटीशी चूकसुद्धा कुण्याच्यातरी जीवावर बेतू शकते. असाच प्रकार हवेत उडणाऱ्या इजीजेटच्या विमानासोबत घडला. त्यानंतर हे विमान एडिनबर्गच्या विमानतळावर तातडीने उतरवावे लागले.

Airplane: विमान हवेत असताना वैमानिक अडकला टॉयलेटमध्ये, प्रवाशांची झाली अशी अवस्था
लंडन - विमान प्रवासचा आनंद घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र विमानामधील एखादी छोटीशी चूकसुद्धा कुण्याच्यातरी जीवावर बेतू शकते. असाच प्रकार हवेत उडणाऱ्या इजीजेटच्या विमानासोबत घडला. त्यानंतर हे विमान एडिनबर्गच्या विमानतळावर तातडीने उतरवावे लागले. मात्र या विमानाच्या दुर्घटनेमागे कुठलीही तांत्रिक गडबड नव्हती. तर फ्लाइटमधील पायलटची प्रकृती बिघडल्याने विमानामध्ये आणीबाणी निर्माण झाली.
EasyJet च्या फ्लाइट नंबर EZY6938ने रविवारी सकाळी ग्रीसमधील हेराक्लिओन येथून स्कॉटिश राजधानीच्या दिशेने उड्डाण केले होते. मात्र उड्डाणादरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला. विमानाच्या आपातकालीन लँडिंगचा मेसेज आला तेव्हा एटीसीमधील अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यानंतर त्वरित अलर्टचा मेसेज दिला गेला. एवढंच नाही तर विमानातील प्रवाशांनी रक्षणासाठी देवाचा धावा सुरू केला.
अखेर एडिनबर्ग विमानतळावर या विमानाची आपातकालीन लँडिंग करण्यात आली. तत्पूर्वी एअरपोर्टवर फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या होत्या. विमानामध्ये असलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, त्याने विमानातील पायलटला टॉयलेटमध्ये दाखल होताना पाहिले होते. मात्र तो बाहेर येताना दिसला नाही. तेव्हा एक तरुण पायलट विमान ऑपरेट करत होता. त्याने कॅप्टन आजारी असल्याने एमर्जन्सी लँडिंग करण्यात येत असल्याचे सांगितले.
प्रवाशांनी सांगितले की, विमानामध्ये सांगण्यात आले की, सदर पायलट सुमारे १३ तासांपासून ड्युटीवर होता. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. तो टॉयलेटसाठी गेला असताना तिथेच त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे तो बाहेर येऊ शकला नाही. तसेच हे विमान सुरुवातीला सुमारे ४५ मिनिटे उशिराने चालत होते.