बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:11 IST2025-12-22T15:11:41+5:302025-12-22T15:11:59+5:30
Bangladesh NCP Leader Shot In Khulna: शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर देशात मोठा हिंसाचार उसळला आहे.

बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
Bangladesh NCP Leader Shot In Khulna:बांगलादेशमध्ये सुरू असलेला हिंसाचार दिवसेंदिवस वाढतोय. अशातच, स्थानिक नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर आता नेशनलिस्ट सिटीजन पार्टी (NCP) च्या खुलना विभागप्रमुख मोतलेब सिकंदर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुलना येथील सोनाडांगा परिसरात भररस्त्यात हा हल्ला करण्यात आला.
डोकं आणि मानेत घुसली गोळी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी (22 डिसेंबर) खुलनामध्ये प्रचार करत असताना सिकंदरवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात त्याच्या डोकं आणि मानेवर गोळ्या लागल्या. गंभीर जखमी अवस्थेत सिकंदरला खुलना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे. हा हल्ला शरीफ उस्मान हादी याच्या हत्येच्या पद्धतीशी साधर्म्य राखणारा असल्याचे सांगितले जात आहे. हादी याचीही डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती.
NCP आणि राजकीय पार्श्वभूमी
नेशनलिस्ट सिटीजन पार्टी (NCP) ही माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनानंतर स्थापन झाली आहे. या पक्षात हसीनाविरोधी आंदोलनात सक्रिय असलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील आहेत. ढाका विद्यापीठातील अनेक विद्यार्थी या पक्षाशी जोडलेले आहेत. बांगलादेशमध्ये NCP पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे.
NCP ला शेख हसीना यांची कट्टर विरोधी पार्टी मानले जाते. पक्षाशी संबंधित नेते नाहिद इस्लाम यांनी याआधी शेख हसीना यांच्यावर तीव्र टीका केली होती. नाहिद हे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि अंतरिम सरकारमध्ये सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
हादी हत्येनंतर वाढलेला हिंसाचार
सिकंदर याच्यापूर्वी इंकलाब मंचचे नेते शरीफ उस्मान हादी याची डोक्यात गोळी मारून हत्या करण्यात आली होती. उपचारासाठी त्याला सिंगापूरला नेण्यात आले होते, मात्र तिथे मृत्यू झाला. हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये हिंसक निदर्शने उसळली. शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनात हादीची भूमिका महत्त्वाची होती. एकूणच, बांगलादेशमध्ये घडत असलेल्या या घटनांमुळे देशातील राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, आगामी काळात परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.