युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:29 IST2026-04-09T14:28:27+5:302026-04-09T14:29:13+5:30
युद्धविरामानंतरही होर्मुझमधील सुरक्षित वाहतुकीवर चिंता आहे त्यामुळे हा प्लॅन बी बनवला जात आहे

युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
अमेरिका आणि इराण यांच्यात २ आठवड्यांसाठी युद्धविराम झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जहाजांची सुरक्षित वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी पाश्चात्य देशांनी आपला प्लॅन बी एक्टिव्ह केला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी फ्रान्सच्या नेतृत्वाखाली सुमारे १५ देश या संरक्षण मोहिमेची योजना आखत असल्याचं जाहीर केले. ही मोहीम पूर्णपणे बचावात्मक असेल आणि इराणच्या समन्वयाने चालवली जाईल. तेल आणि इतर वस्तू वाहून नेणारी व्यापारी जहाजे कोणत्याही धोक्याशिवाय होर्मुझमधून मार्गक्रमण करतील हे सुनिश्चित करणे हा प्लॅनचा हेतू आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गावरून जगातील एकूण तेल व्यापाराच्या २० टक्के वाहतूक केली जाते. जर हा मार्ग बंद राहिला तर जगात ऊर्जा संकट निर्माण होऊन तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ होऊ शकते. त्यातून प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. अलीकडेच अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे या मार्गावरून जहाज वाहतूक ठप्प झाली होती. आता युद्धविराम झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरक्षित सुरू करण्याची तयारी सर्व देश करताहेत.
फ्रान्सनं प्लॅन बी का बनवला?
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांच्या संरक्षण सल्लागार आणि मंत्र्यांच्या बैठकीत सांगितले की, १५ हून अधिक देश या प्लॅनमध्ये सहभागी झालेत. हे मिशन पूर्णपणे फ्रान्सच्या नेतृत्वात असेल. सध्या सुमारे १५ देश फ्रान्सच्या नेतृत्वाखाली आणि इराणच्या समन्वयाने एक संपूर्ण डिफेन्सिव मिशन आखण्यासाठी एकत्र काम करत आहेत जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल. युद्धविरामानंतरही होर्मुझमधील सुरक्षित वाहतुकीवर चिंता आहे त्यामुळे हा प्लॅन बी बनवला जात आहे. जहाज मालकांनाही आजही भीती सतावत आहे. त्यामुळे अमेरिकेचा पूर्ण सहभाग नसतानाही पाश्चात्य आणि मित्र राष्ट्रे सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. या मोहिमेत कोणतेही हल्ले किंवा आक्रमक कारवायांचा समावेश असणार नाही.
दरम्यान, युद्धविराम होऊनही होर्मुझमधील वाहतूक अद्याप पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. जहाज मालक सुरक्षा व्यवस्था आणि विमा संरक्षणाची वाट पाहत आहेत. त्यामुळे पाश्चात्य राष्ट्रांनी 'प्लॅन बी' म्हणून ही बहुराष्ट्रीय संरक्षण मोहीम तयार केली आहे. अमेरिकेच्या थेट सहभागाशिवाय या प्रदेशात सुरक्षा सुनिश्चित करण्याचा हा एक पर्याय आहे. फ्रान्सने यापूर्वी युरोपीय देश आणि इतर भागीदारांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. आता हे प्रयत्न आणखी मजबूत झाले आहेत. फ्रान्सने ३५ देशांशी संपर्क केला होता. त्यातील जवळपास १५ देशांनी या योजनेत सहभागी होण्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जाते.
मिशनचं खास वैशिष्ट काय?
हे मिशन पूर्णपणे बचावत्मक असेल, त्यात हल्ला नसेल. इराणसोबत समन्वयाने हे काम केले जाईल. व्यावसायिक जहाजांना एस्कॉर्ट सुरक्षा पुरवली जाईल. फ्रान्सचं नौदल आणि अन्य देशांची जहाजे यात समाविष्ट असतील. जर हे मिशन यशस्वी झाले तर होर्मुझमधून तेल आणि अन्य सामानाची वाहतूक वेगाने वाढेल. त्यातून जागतिक बाजारात तेलाच्या किंमती स्थिर राहतील.