उत्तर कोरियानं अणुचाचणी घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलावली तातडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 20:37 IST2017-09-04T20:00:50+5:302017-09-04T20:37:57+5:30
उत्तर कोरियाच्या अणुचाचणीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं तातडीची बैठक बोलावली आहे.

उत्तर कोरियानं अणुचाचणी घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलावली तातडीची बैठक
वॉशिंग्टन, दि. 4 - उत्तर कोरियाच्या अणुचाचणीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं तातडीची बैठक बोलावली आहे. संयुक्त राष्ट्रामधले अमेरिकेचे राजदूत निकी हॅलेंनी ट्विटरच्या माध्यमातून रविवारी रात्री याचा गंभीर इशारा दिला होता. ते म्हणाले होते, उत्तर कोरियानं अमेरिकेविरोधात कोणतंही पाऊ उचललं, त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यानंतर त्यांनी बैठक बोलावल्याचीही माहिती दिली.
जपान, इंग्लंड आणि दक्षिण कोरिया या देशांसह आम्ही सुरक्षा परिषदेची उद्या तातडीची बैठक बोलावल्याचं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर क्षेत्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी दिला आहे. उत्तर कोरियानं अमेरिका व त्याच्या सीमांशी निगडित भागात कोणतीही कारवाई केल्यास त्याचे त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही व्हाइट हाऊसनं दिला आहे.
उत्तर कोरियासोबत व्यवहार करणा-या देशांसोबत व्यापार बंद करण्यासंबंधी अमेरिका विचार करत असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं होतं. उत्तर कोरियाने आपण लांबचा पल्ला गाठणा-या मिसालईलसाठी डिझाईन करण्यात आलेल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली असल्याचं सांगितलं आहे. तसंच आपली ही सहावी आणि सर्वात शक्तिशाली अणुचाचणी यशस्वी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.उत्तर कोरियाने घेतलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीतील स्फोटाची शक्ती ही त्यांच्या आधीच्या अणुचाचणीच्या तुलनेत दहापट अधिक होती.
हायड्रोजन बॉम्बची क्षमता आधी परीक्षण करण्यात आलेल्या अणुस्फोटांपेक्षा 9 पट अधिक होती. उत्तर कोरियाने याआधी अणुचाचण्या केलेल्या ठिकाणी जमीन हलल्याची माहिती भूकंपतज्ज्ञांना मिळाली होती. त्याबरोबरच चीन आणि अमेरिकेनेही हा एक स्फोट असल्याचे सांगितले होते.
हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय?
हायड़्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अनेक पटीने संहारक असतो. अणुबॉम्बमध्ये स्फोट घडवण्यासाठी अणुविखंडनाची प्रक्रिया वापरली जाते. तर हायड्रोजन बॉम्बमध्ये केंद्रकीय संमिलन (फ्युजन) प्रक्रियेद्वारे स्फोट घडवून आणला जातो. संमिलनाची प्रक्रिया अणुविखंडनापेक्षा किचकट असते. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्बमध्ये संमिलन घडवण्यासाठी अणुस्फोट केला जातो. त्यामुळे हा स्फोट झाल्यानंतर हायड्रोजनची समस्थानिके असलेल्या ड्युटेरियम, ट्रिटीयम यांच्यात शृंखला अभिक्रिया होऊन मोठ्य़ा प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. शितयुद्धाच्या काळात 1952 साली अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण केले होते. तर 1961 साली रशियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते. मात्र भयंकर संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बचा अद्याप युद्धात वापर करण्यात आलेला नाही.
याआधी उत्तर कोरियावर कडक निर्बंध लादण्याचा ठराव संयुक्त राष्ट्राने मंजूर केल्यानंतर उत्तर कोरियाने तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या ठरावाचा शिल्पकार असणाऱ्या अमेरिकेला याची हजार पटीने किंमत मोजावी लागेल अशी धमकीच उत्तर कोरियाने दिली होती.
संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावर निर्बंध लादल्यास काय होईल ?
1) उत्तर कोरियाकडून कोळसा, मासे, लोहखनिज आणि शिसं कोणालाही आयात करता येणार नाही
2) उत्तर कोरियन कंपन्या किंवा व्यक्तींबरोबर जॉइंट व्हेंचर स्थापन करता येणार नाही
3) सध्याच्या जॉइंट व्हेंचर्समध्ये कोणतीही नवी गुंतवणूक करण्यास बंदी