रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी (१८ ऑगस्ट २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. पुतिन-ट्रम्प बैठकीचा मुख्य अजेंडा रशिया-युक्रेन युद्ध कायमचे संपवण्याचा मार्ग शोधणे, हा होता. ही चर्चा स्पष्ट, शांततापूर्ण आणि अर्थपूर्ण होती, असे पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.
पुतिन यांच्या फोन कॉल नंतर, पंतप्रधान मोदी यांनी एक 'एक्स' पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना, फोन कॉल आणि अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या भेटीसंदर्भातील माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. भारतनेभारताने युक्रेन वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सातत्याने आवाहन केले आहे आणि यासंदर्भात सर्व प्रयत्नांचे भारत समर्थन करतो. मला आगामी काळातही आपल्या निरंतर आदान-प्रदानाची आशा आहे.
पुतिन-ट्रम्प बैठकीतील महत्वाचे मुद्दे - ट्रम्प यांच्यासोबत शनिवारी (१६ ऑगस्ट २०२५) झालेल्या भेटीनंतर पुतिन म्हणाले होते, आपण युद्ध निष्पक्षपणे संपवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. ही बैठक वेळेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त होती. ट्रम्प यांनीही ही बैठक प्रभावी ठरल्याचे म्हटले होते. मात्र याच वेळी, अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही, असेही सांगितले.
रशिया-युक्रेन शांतता करारावर काय म्हणाले ट्रम्प? -दरम्यान, झेलेन्स्की आणि काही युरोपीयन देशांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बाठकीनंतर, ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथच्या माध्यमाने महत्वाची माहिती दिली. रशिया आणि युक्रेन यांच्यात लवकरच शांतता करार होऊ शकतो, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. ते म्हणाले, "अमेरिकेसह अनेर युरोपीय देश, युक्रेनला सुरक्षेची हमी देतील. यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांततेच्या शक्यतेने सर्वच जण अत्यंत आनंदात आहेत. बैठक संपल्यानंतर मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना फोन केला होता आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात एका निर्धारित ठिकानी बैठकीच्या व्यवस्थेला सुरुवात केली आहे."
या शिवाय, "साधारणपणे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी हे एक अत्यंत चांगले पाऊल आहे. उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव विटकॉफ रशिया आणि युक्रेन यांच्यात कॉर्डिनेट करत आहेत," असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.