१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:26 IST2025-10-15T10:26:32+5:302025-10-15T10:26:42+5:30
Afghanistan Pakistan Clashes: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये सीमाभागात चकमक झाल्याचे वृत्त आहे.

१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
Afghanistan Pakistan Clashes: काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. काही काळ तणाव थांबला होता. पण, मंगळवारी रात्री अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. खैबर पख्तूनख्वा येथील कुर्रम जिल्ह्यात अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात चकमक झाली. परंतु, या चकमकीत पाकिस्तानच्या सैन्याने अवघ्या १५ मिनिटांत शरणागती पत्करल्याची माहिती मिळाली आहे.
स्पिन बोल्डक क्षेत्रात पाकिस्तानी सैन्य आणि अफगाणिस्तानचे सैन्य यांच्यात धुमश्चक्री झाली. अफगाण तालिबानने दावा केला आहे की, पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत १५ मिनिटांतच तालिबानने पाकिस्तानी सैनिकांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले आणि त्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली. आणखी एका व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, लढाईच्या १५ मिनिटांतच तालिबानने पाकिस्तानी सैनिकांची शस्त्रे हिसकावून घेतली.
स्थानिकांची घरे उद्ध्वस्त, रहिवाशांनी पळ काढला
स्पिन बोल्डक जिल्ह्याचे माहिती प्रमुख अली मोहम्मद हकमल यांनी सांगितले की, सध्या लढाई सुरू असून, दोन्ही बाजूने गोळीबार होण्याचा आवाज येत आहे. या चकमकीतील मृतांच्या संख्येबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु काही वृत्तानुसार, पाकिस्तानी गोळीबारामुळे स्थानिकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यामुळे अनेक नागरिकांना परिसरातून सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा लागला. अनेक जण या चकमक होत असलेल्या भागातून पसार झाले.
मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा दावा
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य कबीर हकमल म्हणाले, स्पिन बोल्डक भागात तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात भयंकर चकमकी सुरू झाल्या आहेत. काही सूत्रांनुसार, यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. अनेक स्थानिक घरे उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी सैन्य ड्युरंद रेषेवरील भागांना लक्ष्य करत आहेत. परंतु, अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.