अफगाणिस्तानमध्ये एका हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या चार जणांना शुक्रवारी गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा देण्यात आली. या घटनेनंतर आता तालिबानच्या एका नेत्याने, मृत्युदंड इस्लामचा भाग असल्याचे म्हटले आहे. या चारही दोषींना शुक्रवारी एक क्रीडा मैदानात गोळ्या घालण्यात आल्या. महत्वाचे म्हणजे, 2021 मध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून, पहिल्यांदाच एवढ्या लोकांना एकाच दिवसात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. मानवाधिकार गट आणि संयुक्त राष्ट्रांनी या घटनेचा निषेध केला आहे.
तालिबानचा मुख्य प्रवक्ता जबिहुल्लाह मुजाहिदने रविवारी एक ऑडिओ क्लिप जारी केली. यात अखुंदजादा म्हणाला, 'आपण शिस्तीचे उपाय, प्रार्थना आणि उपासना करायला हवी. आपण पूर्णपणे इस्लाम स्वीकारायला हवा. इस्लाम केवळ काही विधींपुरता मर्यादित नाही. तर ही अल्लाहच्या सर्व आज्ञांची एक व्यापक व्यवस्था आहे.'
'इस्लामचा एकही आदेश अपूर्ण सोडू नये' -दक्षिण कंधार प्रांतातील हज प्रशिक्षकांच्या एका चर्चासत्रात ४५ मिनिटांच्या भाषणादरम्यान अखुंदजादा म्हणाला, इस्लामचा एकही आदेश अपूर्ण सोडू नये. अल्लाहने लोकांना त्याची पूजा करण्याचा आणि त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला होता. तालिबानने सत्तेसाठी अथवा पैशासाठी युद्ध केले नाही, तर इस्लामिक कायदा लागू करण्यासाठी युद्ध केले आहे. गुन्हेगारांना गोळ्या घालण्यावरून होत असलेल्या टीका त्याने यावेळी फेटाळून लावल्या. अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने या चारही जणांना हत्येच्या आरोपात दोषी ठरवले होते.