Accurate targeting, British SAS Sniper killed five ISIS terrorists in one shot | अचूक लक्ष्यभेद, जवानाने एका गोळीत केले पाच दहशतवाद्यांचे काम तमाम

अचूक लक्ष्यभेद, जवानाने एका गोळीत केले पाच दहशतवाद्यांचे काम तमाम

लंडन - जागतिक पातळीवर दहशतवाद ही एक गंभीर समस्या बनली आहे. त्यात इराक-सीरियासारख्या देशात तर आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घातला आहे. मात्र या दहशतवाद्यांमध्येही दहशत माजवण्याचे काम ब्रिटनच्या स्पेशल एअर सर्व्हिस (एसएएस) च्या एका स्नायपरने केले आहे. या निशाणेबाज जवानाने सीरियामध्ये सुमारे ९०० मीटर अंतरावरून अचून निशाणा साधत एका गोळीत पाच दहशतवाद्यांचे काम तमाम केले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये आयएसआयएसचा एक वरिष्ठ कमांडर असल्याचे सांगण्यात येत आहे.

डेली स्टारने दिलेल्या रिपोर्टनुसार स्पेशल एअर सर्व्हिस एसएएसच्या या जवानाने सीरियामध्ये तैनात असताना हा कारनामा केला आहे. या स्नायपरने सीरियामध्ये जेहादी आत्मघाती हल्लेखोराच्या स्फोटकांनी भरलेल्या जॅकेटवर सुमारे ९०० मीटर अंतरावरून अचूक निशाणा साधला. या जवानाने अचूक चालवलेल्या गोळीमुळे स्फोटकांनी भरलेल्या जॅकेटमध्ये मोठा स्फोट झाला. त्यामुळे या आत्मघाती हल्लेखोरासह आजूबाजूला असलेले अन्य चार दहशतवादीही ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटिश एसएएसचे कमांडो अनेक दिवसांपासून आयएसआयएच्या बॉम्ब तयार करणाऱ्या कारखान्यावर लक्ष ठेवून होते. नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हालचाल दिसून आली होती. त्यानंतर या तळावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या तळावर लक्ष ठेवून असलेल्या जवानाने या ठिकाणाहून पाच दहशतवाद्यांना बाहेर येताना पाहिले. त्यानंतर या जवानाने याची माहिती आपल्या तळावरील वरिष्ठांना दिली. तेव्हा केवळ एका दहशतवाद्याला ठार मारण्याचे निश्चित झाले. मात्र लक्ष्य दूर असल्याने आणि हवेच्या दिशेत बदल झाल्याने गोळी जाऊन स्फोटके असलेल्या जॅकेटला लागली. त्यात झालेल्या स्फोटात सर्व पाच दहशतवादी मारले गेले.

ब्रिटिश आर्मीने सुरक्षाविषयक कारणांमुळे एसएएसच्या जवानाचे नाव उघड केलेले नाही. मात्र हा स्नायपर .५० कॅलिबर रायफलचा वापर करत होता, असे सांगण्यात येत आहे. ही रायफल ब्रिटिश आर्मीकडील सर्वात शक्तिशाली हत्यार मानले जाते. ब्रिटिश सैन्य गेल्या अनेक वर्षांपासून कुर्दीश सेनेसोबत मिळून आयएसआयएसविरोधात कारवाई करत आहे.

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Accurate targeting, British SAS Sniper killed five ISIS terrorists in one shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.