26/11 हल्ल्याचा आरोपी अब्दुल रहमान मक्कीचा पाकिस्तानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:32 IST2024-12-27T14:31:14+5:302024-12-27T14:32:46+5:30

Abdul Rahman Makki Death: अब्दुल रहमान मक्की, हा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मेव्हूणा होता.

Abdul Rahman Makki Death: 26/11 attack accused Abdul Rahman Makki dies of heart attack in Pakistan | 26/11 हल्ल्याचा आरोपी अब्दुल रहमान मक्कीचा पाकिस्तानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

26/11 हल्ल्याचा आरोपी अब्दुल रहमान मक्कीचा पाकिस्तानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Abdul Rahman Makki Death: भारताचा शत्रू आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मक्की हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी)चा उपप्रमुख आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता. मिळालेल्या माहितीनुसार, मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृत्यू झाला आहे. 2023 मध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्याची सर्व संपत्तीही जप्त करण्यात आली होती. मक्की लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखेचे नेतृत्व करायचा. याशिवाय तो जमात-उद-दावाचा प्रमुखही होता. लष्कराच्या परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी त्याने पार पाडली आहे. विशेष म्हणजे, भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मक्कीचा थेट हात असायचा.

टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा 
हाफिज सईदचा मेहुणा मक्की, याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 2020 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर मक्कीने आपल्या हालचाली कमी केल्या होत्या. दरम्यान, मक्कीवर दहशतवादी वित्तपुरवठा, कट रचणे, षड्यंत्रात सहभाग, लष्कर-ए-तैयबाकडून किंवा त्याच्या पाठिंब्याने दहशतवादी भरती केल्याचा आरोप होता. 

लष्कर-ए-तैयबाचे भारतात मोठे हल्ले 

  • लाल किल्ल्यावर हल्ला: 22 डिसेंबर 2000 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या 6 दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर घुसून सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन जवानांसह तीन जण ठार झाले होते. 
  • रामपूर हल्ला: 1 जानेवारी 2008 रोजी 5 दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचे 7 जवान आणि एका रिक्षाचालकाला प्राण गमवावे लागले.
  • 26/11:  मुंबईत लष्कर-ए-तैयबाने सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. 10 दहशतवादी अरबी समुद्रामार्गे मुंबईत घुसले आणि त्यांनी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 175 जणांचा मृत्यू झाला होता.
  • श्रीनगर हल्ला: 12-13 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीनगरच्या करण नगरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये एक आत्मघाती हल्लेखोर घुसले. यावेळी एक जवान शहीद झाला, तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.
  • बारामुल्ला: 30 मे 2018 रोजी बारामुल्लामध्ये लष्कराच्या दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली होती.

अशा विविध हल्ल्यांमध्ये हाफिज सईद आणि मक्कीचा थेट हात होता. मक्कीला 15 मे 2019 रोजी पाकिस्तान सरकारने अटक केली होती आणि लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवले होते. आता आज अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Abdul Rahman Makki Death: 26/11 attack accused Abdul Rahman Makki dies of heart attack in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.