बांगलादेशमध्ये हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान सोमवारी एका शाळेवरती कोसळले. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला. हे विमान ज्या शाळेवरती पडले त्या शाळेतील २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ढाकामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी भारतातून डॉक्टरांचे एक पथक जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बर्न स्पेशालिस्ट डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक दिल्लीहून ढाक्याला जात आहे. अशा रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणारी आवश्यक वैद्यकीय उपकरणेही भारत पाठवत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
या विमान अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला मदतीचे आश्वासन दिले. सोमवारी २१ जुलै रोजी दुपारी १.०६ वाजता हवाई दलाच्या एफ-७ बीजीआय प्रशिक्षण विमानाने उड्डाण केले. दुपारी १.३० वाजता हे विमान ढाका येथील उत्तरा येथील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीवर पडले. या भीषण अपघातानंतर शाळेच्या इमारतीला आग लागली.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. "भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय मदतीसह बर्न तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक ढाक्याला जात आहे", असं म्हटले आहे. गरज पडल्यास अशा रुग्णांना उपचारांसाठी भारतातही आणता येईल, असंही यामध्ये म्हटले आहे.
एका निवेदनात म्हटले आहे की, "ते रुग्णांच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन गरजेनुसार भारतात पुढील उपचार आणि विशेष काळजी घेण्याची शिफारस करतील. तिकडे गरजेनुसार वैद्यकीय पथके देखील पाठवता येतील. बांगलादेशला पाठवल्या जाणाऱ्या पथकात दिल्लीचे दोन डॉक्टर आहेत. त्यापैकी एक राम मनोहर लोहिया रुग्णालयातील आहे आणि दुसरा सफदरजंग रुग्णालयातील आहे. याशिवाय, बर्न विभागाच्या तज्ज्ञ परिचारिका देखील ढाक्याला जात आहेत.
उच्चस्तरीय समिती तपास करणार
बांगलादेश हवाई दलाने अपघाताची कारणे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सोमवारी झालेल्या या अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला. या संकटात भारत बांगलादेशसोबत उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.