बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:04 IST2025-05-14T14:04:24+5:302025-05-14T14:04:43+5:30
Gold News: भारतातही अनेक ठिकाणी गुप्त धन किंवा किल्ल्यांच्या आजुबाजुला लोक सोने शोधत असतात. पण या शेतकऱ्याला त्याच्या शेतात सोने सापडले आहे.

बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
देशात विदेशात आजही अनेक ठिकाणी राजा रजवाड्यांनी जमिनीत सोने पुरून ठेवले असेल, या आशेने लोक खोदकाम करत असतात. भारतातही अनेक ठिकाणी गुप्त धन किंवा किल्ल्यांच्या आजुबाजुला लोक सोने शोधत असतात. परंतू, फ्रान्सच्या शेतकऱ्याच्या शेतात तब्बल १५० टन सोने सापडले आहे. हा शेतकरी रातोरात मालामाल झाला आहे.
त्याच्या शेतात पडीक जागेवर खोदकाम सुरु होते, काम सुरु असल्याने हा शेतकरी ते पाहण्यासाठी एखादा फेरफटका मारावा म्हणून घरातून निघाला होता. शेतावर पोहोचला तेव्हा सायंकाळचे तिरपे उन पडलेले होते. अशातच खोदकाम केले त्या नाल्याच्या ठिकाणी त्याला पिवळसर काहीतरी चमकताना दिसले. ओलावा असल्याने चिखल झाला होता. त्याने तेथीलच फावडे घेतले आणि थोडे खोदले तर त्याला विश्वासच बसला नाही.
ते चमकत होते ते अस्सल सोने होते. ही जमिन काही सोन्याची खान नव्हती किंवा आजुबाजुला कुठेही सोन्याचे साठे देखील नव्हते. ऑवेर्गनेमध्ये राहणाऱ्या ५२ वर्षीय शेतकरी मिशेल ड्यूपॉन्ट यांच्या शेतात सोने सापडल्याचे वृत्त तज्ञ आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि मग त्यांच्याही रांगा लागल्या. लोक तर बघायला गर्दी करतच होते. तज्ञांनी संशोधन केले तेव्हा त्यांना या जमिनीखाली १५० टन एवढे सोने असल्याचे स्पष्ट झाले. इथे फ्रान्स सरकारची एन्ट्री झाली, सरकारने सर्व जमिन सील केली असून जोवर तपास पूर्ण होत नाही तोवर कोणीही खोदू शकत नाही असे आदेश काढण्यात आले आहेत.
यामुळे शेतकरी मालामाल झालेला असला तरी त्याला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. अनेकांना या शेतकऱ्याची जमीन खरेदी करायची आहे, त्याची ही जमीन खरेदी करण्यासाठी गडगंज श्रीमंत लोक येरझाऱ्या घालू लागले आहेत. या शेतकऱ्याच्या आजुबाजुच्या शेतकऱ्यांनाही प्रलोभने मिळू लागली आहेत. परंतू, फ्रान्सच्या नियमांनुसार सरकारची जोवर परवानगी मिळत नाही तोवर कोणीही जमिनीखालीलच नाही तर वर सापडलेला खजिना देखील नेऊ शकत नाहीत.