नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 23:22 IST2025-12-31T23:19:49+5:302025-12-31T23:22:47+5:30
Japan Noda City Earthquake: जगाला नवीन वर्षाचे वेध लागले असतानाच जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा धक्का जाणवला आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
जगाला नवीन वर्षाचे वेध लागले असतानाच जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा धक्का जाणवला आहे. जपानमधील नोडा सिटी परिसरात आज संध्याकाळी ६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, नोडा शहराच्या पूर्वेला ९१ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा धक्का जाणावला. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
जपानसाठी डिसेंबर महिना भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संकटाचा ठरला आहे. जपानमध्ये या महिन्यात ८ तारखेला ७.५ तीव्रतेचा भूकंप जाणवला. यात अनेक लोक जखमी झाले होते. त्यानंतर १२ डिसेंबरला ६.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र इवाते प्रांतातील कुजी शहरापासून १३० किमी अंतरावर होते. आज पुन्हा महिन्याच्या शेवटच्या दिवशी ६ तीव्रतेच्या धक्क्याने नागरिक हादरले आहेत. जपानमधील घटनेच्या काही वेळ आधी, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:२६ वाजता तिबेटमध्येही ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली १० किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली.
जपान हा जगातील सर्वात जास्त भूकंपप्रवण देश मानला जातो. भौगोलिकदृष्ट्या जपान हा चार प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सच्या वर वसलेला देश आहे. यामुळे या भागात भूगर्भीय हालचाली सातत्याने होत असतात. सुमारे १२.५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात दरवर्षी सरासरी १,५०० भूकंपाचे धक्के जाणवतात. यातील बहुतेक भूकंप सौम्य असतात, मात्र अधूनमधून होणारे मोठे भूकंप जपानसाठी चिंतेचा विषय ठरतात.