Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:32 IST2025-11-26T11:30:21+5:302025-11-26T11:32:50+5:30
Bangladesh News: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये नुकतीच मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. अंतरिम सरकारने त्यांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी भारत सरकारकडे केली असतानाच, आता बांगलादेश भ्रष्टाचार विरोधी आयोग त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेचे नवीन खटले दाखल करण्याच्या तयारीत आहे. बांगलादेशच्या केंद्रीय गुप्तचर विभाग आणि राष्ट्रीय महसूल मंडळाने अलीकडेच शेख हसीना यांच्या बँक लॉकरची तपासणी केली.
बांगलादेशी तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, शेख हसीना यांच्या दोन लॉकरमधून नऊ किलोग्रॅमपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि महागड्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय, लॉकरमध्ये इतरही असंख्य मौल्यवान वस्तू देखील आढळल्या आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, यापैकी अनेक मौल्यवान वस्तू शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात किंवा त्यानंतर कायद्यानुसार घोषित केल्या नव्हत्या. या उत्पन्नाच्या स्रोताची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश भ्रष्टाचार विरोधी आयोग माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध दोन किंवा तीन नवीन खटले दाखल करण्याच्या तयारीत आहे. आरक्षणविरोधी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनंतर शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून, हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या प्रमुख नेत्यांविरुद्ध कोणत्या ना कोणत्या प्रकरणात आर्थिक चौकशी सुरू आहे.
शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांविरुद्ध अंतरिम सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे खटले उघडण्यात आले आहेत. नवीन खटले दाखल झाल्यास शेख हसीना आणि अवामी लीगच्या नेते आणखी अडचणीत येऊ शकतात. दरम्यान, मोहम्मद युनूस आणि शेख हसीना यांच्या शिक्षेविरुद्ध अवामी लीगचे देशव्यापी आंदोलन सुरू झाले असल्याचे वृत्त आहे.