कैरो : भूमध्य सागरात बोट बुडून नव्वदहून अधिक निर्वासितांना जलसमाधी मिळाली. युरोपात चांगले जीवन जगण्याच्या आशेने उत्तर आफ्रिकेहून ते बोटीने निघाले असता ही शोकांतिका घडली. बोट निर्वासितांनी खच्चून भरलेली होती. हे निर्वासित मागच्या आठवड्यात एका बोटीने लिबियाहून निघाले होते. बोट नेमकी कधी बुडाली, हे स्पष्ट झाले नाही, असे डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या समूहाच्या मदत मोहिमेचे प्रमुख जुआन मतियास यांनी सांगितले. फ्रेंचमध्ये या समूहाचे संक्षिप्त नाव एमएसएफ आहे. या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेल्या लोकांनी सांगितले की, शंभर निर्वासितांसोबत आम्हीही या बोटीत होतो. एमएसएफने सांगितले की, एका तेल टँकरने शनिवारी पहाटे चार प्रवाशांना वाचविले. त्यांच्या माहितीनुसार बोटीत शंभराहून अधिक लोक होते. उशीर न करता बचावलेल्या लोकांना सुरक्षित जागा द्यावी, असे आवाहन या मदत संघटनेने इटली आणि माल्टाला केले आहे.
भूमध्य सागरात बोट बुडून ९० निर्वासितांना जलसमाधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 06:57 IST