पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 06:23 IST2025-10-20T06:22:31+5:302025-10-20T06:23:07+5:30
फ्रान्समधील ही सर्वात कमी वेळेतील सर्वात धाडसी चोरी आहे.

पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
पॅरिस : जगभरातल्या अनेक मौल्यवान ऐतिहासिक ठेवा असलेल्या जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयात रविवारी केवळ चार मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तूंची चोरी झाली. या घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ लूव्र संग्रहालय काही दिवसांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
ही चोरी संग्रहालयातल्या अपोलो गॅलरीत झाली. या अपोलो गॅलरीत नेपोलियन तिसरा याची पत्नी युजीन हिचा सोने, हिरे असलेला रत्नजडीत मुकूट चोराने नेला पण नंतर तो तुटलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. फ्रान्समधील ही सर्वात कमी वेळेतील सर्वात धाडसी चोरी आहे.
अशी झाली चोरी
या संग्रहालयाचा एक दरवाजा सीन नदीच्या बाजूला असून तेथून चोरांनी आत प्रवेश केला. या भागात बांधकाम सुरू असल्याने चोरांनी ती संधी साधली. चोरांनी मग अपोलो गॅलरीत पोहोचण्यासाठी मालवाहू लिफ्टचा वापर केला आणि नंतर खिडक्यांची तावदाने फोडून नेपोलियन तिसरा याच्या नऊ वस्तू चोरल्या.
चोरी व दरोड्यांचा इतिहास
लूव्र संग्रहालयात पहिली चोरी १९११ मध्ये झाली होती. त्यावेळी व्हिन्सेंझो पेरुगिया या कामगाराने जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र लंपास केले होते. त्याने कोटात लपवून ते चोरले होते. त्या मुळे मोनालिसाचे चित्र जगप्रसिद्ध झाले.