Saudi Arabia Accident: सौदी अरेबियात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सौदीत झालेल्या रस्ते अपघातात नऊ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारतीय दूतावासाने या अपघाताची माहिती दिली असून त्यांनी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही या घटनेवरुन दुःख व्यक्त केलं असून पीडित कुटुंबांना मदत करण्यास तयार असल्याचे म्हटलं आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.
सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात झालेल्या भीषण अपघातात नऊ भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, जेद्दाहच्या पश्चिम भागाजवळ एका रस्ते अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पीडित असलेल्या कुटुंबांच्या संपर्कात आहेत आणि शक्य ते सर्व मदत करत आहेत. जेद्दाह हे इस्लामचे पवित्र शहर असलेल्या मक्काचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
"सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडील जिझानजवळ झालेल्या रस्ते अपघातात ९ भारतीय नागरिकांच्या दुर्दैवी मृत्युबद्दल आम्हाला तीव्र दुःख आहे. पीडित कुटुंबांना आमच्या मनापासून संवेदना. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावास पूर्ण मदत करत आहे आणि अधिकारी आणि कुटुंबियांच्या संपर्कात आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. पुढील मदतीसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे," असं भारतीय दूतावासाने म्हटलं.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. "या दुर्घटनेबद्दल आणि जीवितहानीबद्दल झाल्याचे ऐकून दुःख झाले. जेद्दाहमधील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो. ते पीडित कुटुंबांच्या संपर्कात आहेत. ते या दुःखद परिस्थितीत शक्य ती सर्व मदत करत आहेत," असं एस. जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.