म्यूजिक फेस्टिव्हलमध्ये अचानक वाढली गर्दी; चेंगराचेंगरी होऊन 8 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 15:23 IST2021-11-06T15:22:39+5:302021-11-06T15:23:22+5:30
कार्यक्रमात स्टेजजवळ अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी सुरू झाली, यानंतर अनेकजण बेशुद्ध पडले.

म्यूजिक फेस्टिव्हलमध्ये अचानक वाढली गर्दी; चेंगराचेंगरी होऊन 8 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
लॉस एंजेलिस : अमेरिकेच्या टेक्सासमधील अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये(Astroworld Music Festival) शुक्रवारी अचानक मोठा गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली. ह्यूस्टन फायर चीफ सॅम्युअल पी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, स्टेजच्या समोरील बाजूने गर्दी अचानक वाढली होती, या गर्दीत श्वास गुदमरुन अनेकजण बेशुद्ध झाले आणि आठ जणांचा मृत्यू झाला.
ह्यूस्टन अग्निशमन विभागाचे प्रमुख सॅम्युअल पेनिया यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर स्टेजसमोर अचानक गर्दी वाढली. या गर्दीमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला, त्यामुळे अनेकजण बेशुद्ध झाले. यानंतर अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. या चेंगरा चेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.
पेनिया यांनी सांगितल्यानुसार, रॅपर ट्रॅविस स्कॉटच्या एस्ट्रोवर्ल्ड फेस्टिवलमधअये सूमारे 50,000 लोकांची गर्दी जमली होती. ह्यूस्टन पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तिथे एवढे लोक जमण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. सध्या पोलिस व्हिडिओ फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत. एस्ट्रोवर्ल्ड अमेरिकन रॅपर ट्रॅविस स्कॉटने सुरू केलेला एक संगीत कार्यक्रम आहे, 2018 मध्ये याची सुरुवात झाली होती.