१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 08:59 IST2026-04-09T08:48:06+5:302026-04-09T08:59:17+5:30
ट्रम्प यांच्या शांतता कराराला इस्रायलने सुरुंग लावला असून लेबनॉनवर भीषण हल्ले सुरु केले आहेत.

१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
Israel Lebanon Conflict: मध्यपूर्वेत शांतता निर्माण करण्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न अवघ्या काही तासांतच बिघडताना दिसत आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये बुधवारी झालेल्या ऐतिहासिक युद्धविरामानंतर काही तासांतच इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले चढवले आहेत. या हल्ल्यांमुळे संतापलेल्या इराणने पुन्हा एकदा जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाची असलेली होर्मुज सामुद्रधुनी बंद केली असून, जगावर आता युद्धासोबतच मोठ्या आर्थिक संकटाचे सावट पसरले आहे.
१० मिनिटांत १०० हल्ले; लेबनॉनमध्ये मृतदेहांचा खच
युद्धविरामाच्या अटी धाब्यावर बसवत इस्रायलने बुधवारी लेबनॉनवर नरसंहार घडवून आणला. इस्रायली हवाई दलाच्या ५० लढाऊ विमानांनी अवघ्या १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणांवर १६० बॉम्ब फेकले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १८२ लोकांचा मृत्यू झाला असून ८०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिजबुल्लाह-इस्रायल युद्धात एका दिवसात झालेला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे.
लेबनॉन करारात नाहीच; इस्रायल आणि अमेरिकेची भूमिका
व्हाईट हाऊस आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, इराणसोबत झालेला युद्धविराम लेबनॉनला लागू होत नाही. ट्रम्प यांनीही "लेबनॉन या कराराचा भाग नाही, हिजबुल्लाहचा मुद्दा आम्ही नंतर मार्गी लावू," असे म्हटल्याने इराणने संताप व्यक्त केला आहे.
लेबनॉनची मदतीसाठी हाक
लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी जगातील मित्र राष्ट्रांना मदतीसाठी आवाहन केले आहे. "इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली करत असून निष्पाप नागरिकांची हत्या करत आहे," असे त्यांनी म्हटले आहे. बेरूतसह दक्षिण लेबनॉनमधील रुग्णालये आता मृतदेह आणि जखमींनी भरली असून रेड क्रॉसच्या १०० हून अधिक रुग्णवाहिका युद्धपातळीवर काम करत आहेत.