बर्गर किंगमध्ये गेले अन् नंतर झाले गायब; अमेरिकेतील 'त्या' चार भारतीयांबाबत धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:12 IST2025-08-03T14:57:30+5:302025-08-03T15:12:13+5:30
अमेरिकेतील बेपत्ता झालेल्या भारतीय वंशाच्या चौघांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बर्गर किंगमध्ये गेले अन् नंतर झाले गायब; अमेरिकेतील 'त्या' चार भारतीयांबाबत धक्कादायक माहिती समोर
Indian Origin Family Missing in US: अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार सदस्य बेपत्ता झाले होते. मंगळवारी बेपत्ता झालेल्या कुटुंबांचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते शेवटचे २९ जुलै रोजी पेनसिल्व्हेनियातील बर्गर किंग रेस्टॉरंटमध्ये दिसले होते. त्यांचा शेवटचा क्रेडिट कार्ड व्यवहार येथून झाल्याचेही पोलिसांना आढळले आहे. मात्र त्यांचा पत्ता लागत नव्हता. मात्र आता त्या चौघांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौघांचाही एका अपघातात मृत्यू झाला.
अमेरिकेतील मार्शल काउंटी येथील शेरीफ माइक डौगर्टी यांनी शनिवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिली. न्यू यॉर्कमधील बफेलो येथून वेस्ट व्हर्जिनियाला जाताना बेपत्ता झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार सदस्य एका भयानक कार अपघातात मृतावस्थेत आढळले आहेत. अमेरिकेतील आशा दिवाण (८५), किशोर दिवाण (८९), शैलेश दिवाण (८६) आणि गीता दिवाण (८४) हे चौघेही २९ जुलैपासून बेपत्ता होते. हे कुटुंब बफेलोहून वेस्ट व्हर्जिनियातील मार्शल काउंटीमधील प्रभुपाद पॅलेस ऑफ गोल्ड येथे जात होते. चौघेही हिरव्या टोयोटा कॅमरी कारमधून प्रवास करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची हलक्या हिरव्या रंगाची टोयोटा कॅमरी २ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता वेस्ट व्हर्जिनियातील मार्शल काउंटीमधील बिग व्हीलिंग क्रीक रोडवरील एका उंच कड्याजवळ आढळली. न्यू यॉर्कमधून बेपत्ता झालेले हे चौघेही मृतावस्थेत आढळले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती जाहीर केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले.
भारतीय वंशाचे हे कुटुंब मंगळवारी २९ जुलै रोजी दुपारी २:४५ वाजता पेनसिल्व्हेनियातील एरी येथील पीच स्ट्रीटवरील बर्गर किंग रेस्टॉरंटमध्ये शेवटचे दिसले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन सदस्य फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना दिसत होते. तिथेच त्यांना शेवटचे पाहिले गेले होते. तिथे त्यांनी क्रेडिट कार्ड स्वाईप केले होते. त्यानंतर पेनसिल्व्हेनिया स्टेट ट्रूपरच्या नंबर प्लेट रीडरने त्यांची कार इंटरस्टेट ७९ वर दक्षिणेकडे जाणारी दिसली. ते वेस्ट व्हर्जिनियातील माउंड्सविले येथील प्रभुपादांच्या गोल्ड पॅलेस या आध्यात्मिक आश्रमाकडे जात होते.
सेलफोन टॉवर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे डिव्हाईस शेवटचे ३० जुलै रोजी पहाटे ३ वाजता माउंड्सविले आणि व्हीलिंगमध्ये सक्रिय होते. त्यांच्या बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांत त्यांच्याशी संपर्क साधला गेला नाही.