नेदरलँडमध्ये ३८ वर्षीय रॉब जेटन पहिले 'गे' पंतप्रधान; राजाने नवीन सरकारला दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 06:35 IST2026-02-24T06:34:46+5:302026-02-24T06:35:40+5:30
१५० जागांपैकी युतीकडे केवळ ६६ जागा आहेत. त्यामुळे नवीन कायदा संमत करून घेण्यासाठी रॉब जेटन यांना विरोधी पक्षांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

नेदरलँडमध्ये ३८ वर्षीय रॉब जेटन पहिले 'गे' पंतप्रधान; राजाने नवीन सरकारला दिल्या शुभेच्छा
द हेग: डच राजे विलेम-अलेक्झांडर यांनी नेदरलँड्सच्या ३८ वर्षीय रॉब जेटन या तरुण पंतप्रधानांच्या
नेतृत्वाखालील अल्पसंख्याक डच युती सरकारला सोमवारी शपथ दिली. ते देशाचे पहिले गे पंतप्रधान बनले आहेत. रॉब जेटन हे ३ पक्षांच्या युती सरकारचे नेतृत्व करत आहेत. हे एक अल्पमतातील सरकार आहे.
संसदेच्या १५० जागांपैकी या युतीकडे केवळ ६६ जागा आहेत. त्यामुळे नवीन कायदा संमत करून घेण्यासाठी जेटन यांना विरोधी पक्षांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.
जेटन व मंत्र्यांना हेगच्या काठावर असलेल्या राजवाड्याच्या सुशोभित ऑरेंज हॉलमध्ये विलेम-अलेक्झांडर यांनी शपथ दिली. राजाने नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या.
रशिया-युक्रेन युद्धाच्या चौथ्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला पदभार स्वीकारताना जेटन यांनी युक्रेनला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. शपथविधी सोहळ्या वेळी पॅलेसबाहेर 'एक्स्टिंक्शिन रिबेलियन' पर्यावरणवादी संघटनेने निदर्शने करून व मंत्री औपचारिक फोटोसाठी रांगेत उभे असताना सायरन वाजवत नव्या सरकारचे लक्ष वेधून घेतले.