गाझात ३७०० मुले ठार; युद्धातील आतापर्यंत मारल्या गेलेल्या १० हजारांमध्ये ४० टक्के मुले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:45 PM2023-11-03T12:45:06+5:302023-11-03T12:45:06+5:30

स्थिती अतिशय भयानक, हाती काहीच राहिले नाही...

3700 children killed in Gaza; 40 percent of the 10,000 killed in the war so far are children | गाझात ३७०० मुले ठार; युद्धातील आतापर्यंत मारल्या गेलेल्या १० हजारांमध्ये ४० टक्के मुले

गाझात ३७०० मुले ठार; युद्धातील आतापर्यंत मारल्या गेलेल्या १० हजारांमध्ये ४० टक्के मुले

रफाह : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पहिल्या २५ दिवसांत तब्बल ३,७०० हून अधिक पॅलेस्टिनी मुलांनी आपला जीव गमावला आहे. गाझातील आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. हवाई हल्ले, रॉकेटद्वारे लक्ष्य करण्यात आलेले, स्फोटांमुळे भाजले गेलेले आणि इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लहान मुले, महिला, वृद्ध दबले गेले आहेत. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढू शकतो. गजबजलेल्या गाझा पट्टीच्या २३ लाख नागरिकांपैकी जवळपास निम्मे लोक १८ वर्षांखालील आहेत आणि युद्धात आतापर्यंत मारल्या गेलेल्यांमध्ये ४० टक्के मुले आहेत. हवाई हल्ल्यातील दृश्यांमध्ये रक्ताने माखलेल्या मुलाला वाचवणाऱ्या, आपल्या मुलाचे शरीर छातीशी घट्ट पकडलेल्या पित्याची छायाचित्रे पाहून जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्थिती अतिशय भयानक...

जागतिक धर्मादाय संस्था सेव्ह द चिल्ड्रेनच्या मते, गाझामध्ये गेल्या तीन वर्षांत जगातील इतर कोणत्याही संघर्षापेक्षा फक्त तीन आठवड्यांत जास्त मुले मारली गेली आहेत. गेल्या वर्षी दोन डझन युद्ध क्षेत्रांमध्ये २,९८५ मुले मारली गेली. गाझामध्ये पालक होणे हा एक शाप आहे, अशी प्रतिक्रिया एका आठ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या अहमद यांनी दिली.

हाती काहीच राहिले नाही...

आपली चार वर्षांची मुलगी केन्झीविषयी सांत्वना व्यक्त करताना लेखक ॲडम अल-मधौन म्हणाले की, जेव्हा घरे उद्ध्वस्त होतात तेव्हा ते मुलांच्या डोक्यावर पडतात. ती एका हवाई हल्ल्यात वाचली.  मात्र, हल्ल्यात तिचा उजवा हात कापला गेला, डावा पाय चिरडला गेला आणि कवटी फ्रॅक्चर झाली.

इस्रायलचे म्हणणे ...

  1. इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांच्या हवाई हल्ल्यांनी हमासच्या तळ आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे.
  2. हमास नागरिकांचा ढाल म्हणून वापर करत असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. 
  3. ५०० पेक्षा अधिक हमासची रॉकेट त्यांचे लक्ष्य चुकले आणि गाझामध्ये पडले. यात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी ठार झाले, असे इस्रायलने म्हटले आहे.


१ वर्षाची ती कुटुंबात एकटीच उरली

६८ नातेवाईकांना गमावलेल्या यास्मिन म्हणाल्या की, तुम्ही मृत्यूच्या तावडीतून सुटू शकत नाही. त्यांच्या परिवारात केवळ एकच नातेवाईक उरला आहे. तिचे नाव मिलिशा असून, ती केवळ १ वर्षाची आहे. या लहान मुलीने असा काय गुन्हा केला की तिला अनाथ जीवन जगावे लागले?, असा सवाल यास्मिन यांनी केला. नुकतीच मिलिशाने चालायला सुरुवात केली होती. पण आता तिला कधीच चालता येणार नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या हवाई हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला त्याच हवाई हल्ल्यात तिच्याही पाठीचा कणा तुटला असून, छातीपासून खाली लकवा मारला आहे.

Web Title: 3700 children killed in Gaza; 40 percent of the 10,000 killed in the war so far are children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.